Thursday, February 12, 2026 03:28:01 AM

Parth and Sharad Pawar Meeting: बारामतीत खलबतं! शरद पवारांच्या बैठकीला पार्थ आणि जय पवारांची हजेरी, या बैठकीत काय ठरलं?

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीमुळे बारामतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

parthsharad pawar meeting बारामतीत खलबतं शरद पवारांच्या बैठकीला पार्थ आणि जय पवारांची हजेरी या बैठकीत काय ठरलं

बारामती: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामधील दुर्दैवी मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बारामतीत सध्या पवार  'कुटुंब' पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. निमित्त ठरले ते विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडलेली महत्त्वाची बैठक. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. 'पडद्यामागे नक्की काय शिजतंय?' या प्रश्नाने सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, कौटुंबिक स्नेह आणि राजकीय रणनीती यांची एक वेगळीच सांगड येथे पाहायला मिळत आहे.

'सुनेत्रांना आनंदाने आशीर्वाद देईन'

 नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या संयमी शैलीत अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सुनेत्रा पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, "त्या जर भेटायला आल्या, तर मी त्यांचे आनंदाने स्वागत करेन आणि त्यांना आशीर्वाद देईन," अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणे आणि त्यांना मिळालेली संधी यावरही पवारांनी आनंद व्यक्त केला. राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक नात्यातील ओलावा त्यांनी या विधानातून जपल्याचे दिसून आले.

फडणवीसांच्या 'विलीनीकरणा'च्या दाव्यावर जोरदार प्रहार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर शरद पवारांनी सडकून टीका केली. "ज्या चर्चेत फडणवीस यांचा दुरान्वये संबंध नाही, तिथे त्यांनी भाष्य करण्याचा अधिकारच उरत नाही," अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना सुनावले. अद्याप अशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसताना फडणवीसांनी केलेला दावा अनाठायी असल्याचे सांगत, पवारांनी प्रत्यक्ष घडामोडींवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: Data Tracking : सावधान! फेसबुक-इन्स्टाग्राम ठेवतं तुमच्यावर पाळत? ऑनलाईन डेटा चोरी रोखण्यासाठी 'ही' सेटिंग आताच बदला

विद्या प्रतिष्ठानमधील खलबतं; राजकीय समेट? 

विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार, पार्थ आणि जय पवार यांच्यात झालेली बैठक ही केवळ संस्थात्मक कामासाठी नव्हती, असे मानले जात आहे. अजित पवार हे यापूर्वी प्रमुख विश्वस्त होते, मात्र आता त्यांच्या जागी पार्थ किंवा जय पवार यांची वर्णी लावण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच अजित पवारांच्या स्मारकाबाबतही विषयाने डोकं वर काढलं. या बैठकीत अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली, ज्यामुळे या बैठकीला कौटुंबिक समेटाची किनार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या बैठकीमध्ये शरद पवार यांनी जय आणि पार्थ पवार यांना मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर जय पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिथे मुखाग्नी दिला गेला, त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. एकंदरच या बैठकीनंतर जय पवार हेही राजकारणात सक्रिय होणार असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून जाणवत होते.

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या वावड्या उठत असताना, या बैठकीत त्या दिशेने काही पावले उचलली गेली का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सध्या होणाऱ्या चर्चेवर शरद पवारांनी अधिक भाष्य करणे टाळले असले, तरी पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीची शरद पवारांसोबतची जवळीक बरेच काही सांगून जात आहे. बारामतीच्या या 'चाणक्य' नीतीचा पुढचा टप्पा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतो.

हेही वाचा: Ban On Social Media: 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी; 'या' देशाने घेतला ऐतिहासिक निर्णय


सम्बन्धित सामग्री