रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या किनाऱ्यावर तब्बल पाच वर्षांपासून अडकून पडलेले ‘बसरा स्टार’ हे मोठे मालवाहू जहाज अखेर भंगारात रूपांतरित होत आहे. 35 कोटी रुपये किंमतीच्या या जहाजाची कहाणी थक्क करणारी असून, त्याचा शेवट मात्र हळहळ वाटावा असा झाला आहे.
3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज भरकटले आणि मिऱ्या किनाऱ्याजवळील खडकांमध्ये अडकून बसले. तेव्हापासून हे जहाज किनाऱ्यावरच पडून होते. सुरूवातीला ते परत समुद्रात सोडण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर दीर्घ काळ त्याकडे दुर्लक्ष झाले. खाऱ्या पाण्याचा सातत्याने होणारा मारा, देखभाल आणि दुरुस्तीचा अभाव यामुळे हे जहाज हळूहळू सडू लागले.
हेही वाचा: IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या पराभवाने नीता अंबानींना कोट्यवधींचा तोटा; फायनलमध्ये न पोहोचल्यामुळे गमावले ‘हे’ कमर्शियल फायदे
या काळात 'बसरा स्टार' जहाज अनेक स्थानिक तरुणांचे आणि पर्यटकांचे आकर्षण ठरले. सोशल मीडियावर अनेकांनी या जहाजासोबत फोटो, सेल्फी आणि व्हिडिओ रील्स तयार करून पोस्ट केल्या. त्यामुळे हे जहाज लोकप्रिय स्थळ बनले होते. काहींसाठी हे एक 'फोटो पॉइंट' तर काहींसाठी साहसी भटकंतीचं ठिकाण बनलं.
मात्र आता या जहाजाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. भंगारात काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, अवघ्या दोन कोटी रुपयांमध्ये हे जहाज विकले गेले आहे. पाच वर्षांपूर्वी ज्याची किंमत 35 कोटी रुपये होती, ते जहाज आता केवळ लोखंडाचा ढिगारा बनले आहे. सध्या त्याचे दोन मोठे तुकडे करण्यात आले असून, उर्वरित भागही काही दिवसांत हटवण्यात येणार आहेत.
हेही वाचा: गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी प्रस्तावाला गती; मंत्री नितेश राणे यांचे बंदरे विभागाला नियोजनाचे आदेश
या प्रक्रियेमुळे मिऱ्या किनाऱ्याचा परिसर लवकरच पुन्हा मोकळा आणि सुरक्षित होणार आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई आवश्यक होती. मात्र ‘बसरा स्टार’ जहाजाची आठवण अनेकांच्या मनात कायम राहील.