Monday, March 09, 2026 08:38:28 AM

Ratnagiri Tragedy: खेळ रंगात आला, पण श्वास थांबला... रत्नागिरीत क्रिकेट सामन्यादरम्यान फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

चिंचखारी येथे सुरू असलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान प्रवीण पवार या खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

ratnagiri tragedy खेळ रंगात आला पण श्वास थांबला रत्नागिरीत क्रिकेट सामन्यादरम्यान फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Ratnagiri Tragedy: रत्नागिरी जिल्ह्यातून एक अत्यंत चटका लावणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचखारी येथे सुरू असलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान प्रवीण पवार या खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा सामना 'लाईव्ह' प्रक्षेपित केला जात असतानाच ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेले आहे.

लाईव्ह प्रक्षेपणादरम्यान खेळाडू कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचखारी येथील मैदानावर 'स्वराज प्रतिष्ठान' आणि 'कोकण नगर' या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. स्वराज प्रतिष्ठानचा संघ फलंदाजी करत असताना प्रवीण पवार नॉन-स्ट्राइक एंडवर उभा होता. समोरचा फलंदाज पार्थ याने फटका मारल्यानंतर प्रवीण धाव घेण्यासाठी काही अंतर पुढे गेला आणि पुन्हा आपल्या क्रीजकडे परतत होता. मात्र, पंचांच्या जवळ पोहोचताच तो अचानक अडखळला आणि थेट जमिनीवर कोसळला. उपस्थित खेळाडूंनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु मैदानावरच त्याची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: धोकादायक लँडिंगचा आदेश कुणी दिला? अजित पवार विमान दुर्घटनेत तपासाला निर्णायक वळण

क्रिकेट विश्वात शोककळा
प्रवीण पवार याने रत्नागिरी शहर आणि परिसरात आपल्या क्रिकेट कौशल्याने मोठे नाव कमावले होते. एक निष्णात फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात प्रवीणच्या शेवटच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. एका उमद्या खेळाडूचा खेळता खेळता असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाढते हृदयविकाराचे झटके चिंतेचा विषय
देशभरात सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. खेळताना किंवा व्यायाम करताना अचानक येणाऱ्या या झटक्यांनी अनेक जीव घेतले आहेत. प्रवीण पवार याच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील सुरक्षितता आणि खेळाडूंच्या नियमित आरोग्य तपासणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेने स्वराज प्रतिष्ठान संघासह रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 


सम्बन्धित सामग्री