Bawankule slams Uddhav Thackeray: चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भाषणावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या भाषणाला 'पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता' असे संबोधले आहे. बावनकुळे म्हणाले की, 'जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच आज उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘शिवसेना संपली नाही’ असं सांगताना त्यांनी स्वतः ‘सेना’ गमावली आहे, तसेच ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे आधारही सोडून ते सोनिया गांधींच्या चरणी गेले.'
हेही वाचा: कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा
पुढे टीका करताना बावनकुळे म्हणाले, 'मोदीजी, अमितभाई आणि देवेंद्रजी यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे. पण जेव्हा हे नेते देशभर दौरे करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे.' मुंबई संदर्भात बोलताना ते म्हणाले, 'मुंबई आमची’ म्हणणाऱ्यांनी आधी सांगावं की, मुंबईतल्या मराठी माणसासाठी त्यांनी काय केलं? सत्ता असूनही झोपडपट्ट्या, पाणी योजना, शिक्षण, आरोग्य यामध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही.'
बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना या सगळ्या भाजप-देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झाल्या आहेत. 'मुंबईवर विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल, तर भाजप- महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे,' असंही ते म्हणाले.
अखेर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं, 'तुमचे पुढील आयुष्य टोमणे मारण्यातच जाणार आहे. लोकसेवा करण्याची तळमळ तुमच्यात नाही, आणि महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे.'