Sunday, July 13, 2025 10:38:39 AM

जालन्यात अनुदान वाटपात मोठा घोटाळा! बनावट शेतकरी दाखवून 35 कोटींचा गैरव्यवहार; 10 तलाठी निलंबित

या प्रकरणात 10 तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तलाठ्यांनी बनावट शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम स्वत:च्या खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जालन्यात अनुदान वाटपात मोठा घोटाळा बनावट शेतकरी दाखवून 35 कोटींचा गैरव्यवहार 10 तलाठी निलंबित
subsidy distribution Scam In Jalna प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

जालना: गारपीट आणि मुसळधार पावसामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु,  अधिकाऱ्यांनी अनुदान देण्यासाठी आलेल्या निधीत मोठा गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलं आहे. शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या सरकारी अनुदान वाटपात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात 10 तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तलाठ्यांनी बनावट शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम स्वत:च्या खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सरकारी तिजोरीला सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या संपूर्ण घोटाळ्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

26 अधिकाऱ्यांचा घोटाळ्यात सहभाग - 

दरम्यान, प्रशासकीय चौकशीदरम्यान असे आढळून आले की जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तहसीलमधील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांसह एकूण 26 अधिकारी या घोटाळ्यात सहभागी होते. या अधिकाऱ्यांनी खऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने बनावट अर्ज तयार केले आणि अनुदानाची रक्कम काढून घेतली.

हेही वाचा - 'तर 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती'; शंभूराजांचा पाटणकरांना टोला

10 तलाठ्यांवर कारवाई

प्राप्त माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्या 10 तलाठ्यांची नावे गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाणे, शिवाजी ढलके, कल्याण बामनावत, सुनील सोरमारे, प्रवीण शिंगारे आणि बी.आर. भुसारे अशी आहेत. इतर आरोपी अधिकाऱ्यांकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्यांच्या उत्तरांच्या आधारे प्रशासन पुढील कारवाई करेल. या संपूर्ण घोटाळ्याची बातमी समोर आल्यानंतर जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - Bachchu Kadu: सोमवारपासून बच्चू कडूंचं पाणीत्याग आंदोलन

दरम्यान, जालना जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 2022 ते 2024 मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने मदत रकमेच्या स्वरूपात अनुदान वाटपाची घोषणा केली होती. याचं अनुदानाच्या वाटपात आता हा मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. प्रशासकीय अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  


सम्बन्धित सामग्री