Tuesday, November 11, 2025 01:33:37 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी घेतली बाबासाहेब आगे कुटुंबीयांची भेट

काही दिवसांपूर्वी माजलगावात भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांचा खून झाला होता. नुकताच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी किटी आडगाव येथे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी घेतली बाबासाहेब आगे कुटुंबीयांची भेट

बीड: काही दिवसांपूर्वी माजलगावात भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांचा खून झाला होता. नुकताच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी किटी आडगाव येथे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 'बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबीयांना आपण लागेल ती मदत करू,' अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी यापूर्वीच जाहीर केली होती. शनिवारी पंकजा मुंडे यांनी बाबासाहेब आगे यांच्या आई आणि पत्नी यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यादरम्यान, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून हात झटकले

बाबासाहेब आगे हत्या प्रकरण:

बीड येथील माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार भरदिवसा स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेल्या भाजप कार्यालय परिसरात घडला होता. या प्रकरणातील आरोपी नारायण शंकर फापाळ यांनी बाबासाहेब आगे यांची हत्या केल्यानंतर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन हत्या कबूल केली होती.

भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी बाबासाहेब आगे भाजप कार्यालयाकडे जात होते. त्यादरम्यान, नारायण फापाळने आपल्या शर्टच्या पाठीमागे लपवलेला कोयता बाहेर काढून बाबासाहेब आगे यांच्यावर हल्ला केला. थोड्याच वेळात, बाबासाहेब आगे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हा प्रकार स्थानिकांनी पाहिला, परंतु तो क्षणातच घडल्यामुळे कोणीही काही करू शकले नाही. या घटनेनंतर आरोपीने थेट पोलीस ठाणे गाठून आपल्याच हातांनी हत्या केल्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात आर्थिक वादामुळे बाबासाहेब आगे यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


सम्बन्धित सामग्री