मुंबई: कफ परेड ते आरे या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता बीकेसी आणि वरळी मेट्रो स्थानकातही गळतीचे प्रकार समोर आले आहेत. काही ठिकाणी भिंतींना ओलावा तर काही भागात छतातून पाणी गळताना दिसत आहे.
हेही वाचा: Maruti Chitampalli: पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
वरळी मेट्रो स्थानकात चार ठिकाणी गळती सुरू असून याआधी गळती थांबवण्यासाठी एमएमआरसीने त्या ठिकाणी पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या. त्यामुळे एमएमआरसीवर टीकेची झोड उठली होती. आता मात्र कर्मचाऱ्यांकडून गळती होणाऱ्या भागांमध्ये सतत पाणी पुसण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, बीकेसी मेट्रो स्थानकातील गळती होणारे भाग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मंगळवारी दोऱ्यांनी बंदिस्त केले होते. स्थानकात 'चित्रीकरणास मनाई' असे फलकही लावण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकाराबाबत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी छायाचित्रे समाजमाध्यमांवर शेअर करत यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: राणे बंधूंमध्ये नव्या वादाची ठिणगी; सोशल मीडियावर 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाले...
वर्षा गायकवाड यांचे ट्वीट:
पाऊस नसतानाही मुंबई मेट्रोची अॅक्वा लाईन तिच्या नावाप्रमाणे जगते! हे आज बीकेसी मेट्रो स्टेशन आहे. छतावरून सतत गळती होत आहे, इतकी की एका छोट्याशा भागाला वेढा घातला गेला आहे. काही काळापूर्वी आपण आचार्य अत्रे चौकाची पूर्णपणे नासधूस आणि अनेक स्थानकांवर पाणी साचलेले पाहिले. स्टेशनच्या बाहेर पडण्याचे मार्गही ताडपत्रीने झाकलेले पाहिले. पण प्रश्न असा आहे की या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर काही कारवाई झाली का? हे ट्रिपल इंजिन भ्रष्ट सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे आणि महाराष्ट्राला निर्भयपणे लुटत आहे. लाज वाटते.