Wednesday, February 18, 2026 08:56:22 AM

BMC Mayor Election: मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित सुटलं; भाजपचा गटनेता ठरला, अमित साटम यांनी थेट नावच सांगितलं

बीएमसीत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

bmc mayor election मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित सुटलं भाजपचा गटनेता ठरला अमित साटम यांनी थेट नावच सांगितलं

मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच गटनेतेपदाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. या संदर्भात भाजप नेते आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन गटनेतेपदाच्या निवडीची अधिकृत माहिती दिली असून, महापौर निवडीबाबतची प्रतीक्षा अद्याप कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिकेतील गटनेतेपदासाठी गणेश खणकर यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा अमित साटम यांनी केली. ही घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या परवानगीनेच आपण ही घोषणा करत असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना साटम यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे कोकण भवन येथे जाणार असून, दोन्ही पक्षांची गटनोंदणी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Sandeep Deshpande: 'पक्षांतर्गत बदल होत असतात...'; मुंबईत मनसे-भाजप युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), शिवसेना आणि भाजप यांच्यातील एकत्रित भूमिकेबाबतही साटम यांनी भूमिका स्पष्ट केली. “आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आमचा विरोध एखाद्या व्यक्तीला होता, पक्षाला नव्हता. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे कोकण भवन येथे गटनोंदणी करणार आहोत,” असे अमित साटम यांनी सांगितले.

महापौर पदाच्या निवडीबाबत माहिती देताना साटम म्हणाले की, “118 निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एका महिला नगरसेविकेची या आठवड्यात महापौरपदी निवड होईल.”

मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताचा आकडा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “महानगरपालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 114 नगरसेवकांची आवश्यकता होती. आमच्याकडे 118 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्याचा ठाम दावा केला आहे.”

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गट पक्षाच्या भूमिकेवरही भाष्य केले. “राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आमच्यासोबत असणारच आहेत, कारण आम्ही राज्य सरकारमध्ये एकत्र आहोत,” असे साटम यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Coastal Road: मुंबईकरांचा प्रवास सुसाट, वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडच्या कामातील मोठा अडथळा दूर; 'असा' असेल नवा मार्ग


सम्बन्धित सामग्री