मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या महापौरपदाच्या खुर्चीकडे. 11 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडीसाठी 7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. मात्र, नेमकी याच काळात 9 फेब्रुवारीला सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा सुरू होत आहे. कोकणी माणसासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या या जत्रेला अनेक नगरसेवक दरवर्षी न चुकता हजेरी लावतात. परंतु, यावेळी सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी आणि संभाव्य ‘फोडाफोडी’ टाळण्यासाठी पक्षांनी निवडून आलेल्या शिलेदारांना मुंबईतच खिळवून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप आणि शिवसेना (उबाठा) चा ‘व्हिप’ जारी
भाजप आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही प्रमुख पक्षांनी नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबईबाहेर न जाण्याचे कडक फर्मान सोडले आहे. “आधी निष्ठा, मग बाकी सर्वकाही” अशीच काहीशी स्थिती सध्या नगरसेवकांची झाली आहे. जर कोणाला अपरिहार्य कारणास्तव जावे लागलेच, तर 10 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा: Sunetra Pawar: जबाबदारी वाढली आणि सुरक्षाही...; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा कवच
महायुतीत खलबतं आणि समित्यांचे वाटप
भाजपने यंदा 89 जागा जिंकून मोठे यश मिळवले असले, तरी महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याचे चित्र अद्याप धूसर आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीमध्ये स्थायी आणि सुधार समितीच्या महत्त्वाच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) देखील आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करताना एकही मत इकडे-तिकडे होऊ नये, यासाठी पक्षाचे ‘वॉचस्कॉड’ सज्ज झाले आहेत.
गणेश खणकर यांचे स्पष्ट संकेत
भाजपचे महापालिका गटनेते गणेश खणकर यांनी या निर्णयाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “महापौर निवडणुकीत भाजपला कोणतीही अडचण नाही, परंतु शिस्त महत्त्वाची आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर तीन दिवसांत वैधानिक समित्यांचे काम सुरू होईल. त्यामुळे कोणालाही परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाण्याची मुभा नाही.” त्यांच्या या विधानावरून भाजप कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाही, हे स्पष्ट होते.
कोकणचा ‘कौल’ की मुंबईचा ‘कळस’?
एकीकडे भराडी देवीचा कौल घेण्यासाठी कोकणात लाखो भाविक जमणार असताना, मुंबईत मात्र सत्तेचा ‘कळस’ कोण चढवणार याची चुरस पाहायला मिळणार आहे. शनिवार-रविवार सुट्टी आणि त्यानंतर लागलीच येणारी आंगणेवाडीची जत्रा यामुळे नगरसेवकांची पावले कोकणाकडे वळू नयेत, यासाठी पक्षांनी लादलेली ही ‘मुंबईबंदी’ किती यशस्वी ठरते, हे येत्या 11 फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल.
हेही वाचा: India Cricket Team T20: टीम इंडियाला T20 वर्ल्ड कपपूर्वीच मोठा धक्का; 'या' खेळाडूच्या दुखापतीने बीसीसीआयचं टेन्शन वाढवलं