Thursday, February 12, 2026 03:47:59 AM

BMC Mayor: ठाकरेंच्या मनातलं देवाभाऊंच्या ओठावर? डाव फसला; मुंबईच्या महापौर पदासाठीचं सगळंच चित्र पलटणार?

जर आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघाले, तर सभागृहात बहुमत नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौरपद मिळण्याची शक्यता असून, महायुतीसाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो.

bmc mayor ठाकरेंच्या मनातलं देवाभाऊंच्या ओठावर डाव फसला मुंबईच्या महापौर पदासाठीचं सगळंच चित्र पलटणार

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या सत्तासंघर्षाचा काळ सुरू असतानाच, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौरपदाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक शक्यता समोर येत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, आजच्या दिवसभरातील घडामोडी उद्धव ठाकरे यांच्यासाठी 'गेमचेंजर' ठरण्याची चिन्हे आहेत. "देवाच्या मनात असेल तर..." हे उद्धव ठाकरेंचे वाक्य आज खरे ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज (22 जानेवारी) मंत्रालयात सकाळी 11 वाजता राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत निघणार असून, यात मुंबईच्या नशिबात काय लिहिले आहे, हे स्पष्ट होईल.

राजकारणात आकड्यांचे गणित महत्त्वाचे असते, पण कधीकधी नशिबाचा एक फासा संपूर्ण बाजी पलटवू शकतो. मुंबई महानगरपालिकेत सध्या भाजपचे 89, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 आणि शिंदे गटाचे 29 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 114 चा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. वरकरणी हे गणित महायुतीच्या बाजूने दिसत असले तरी, जर आजच्या सोडतीत मुंबईचे महापौरपद 'अनुसूचित जमाती' (ST) साठी राखीव झाले, तर मात्र उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने 'बाजीगर' ठरतील. कारण, भाजप आणि शिंदे सेनेकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही, आणि इथेच ठाकरे गटाला लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: Stock Market Today: गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू; शेअर बाजाराने सलग तीन दिवसांची मरगळ झटकली, नेमकं काय झालं?

या राजकीय समीकरणाचा बारकाईने अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाचे दोन हुकमी एक्के आहेत. प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वाळवी आणि प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे हे दोन नगरसेवक याच प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यामुळे, जर नियतीने साथ दिली आणि आरक्षण ST प्रवर्गासाठी निघाले, तर सभागृहात बहुमत नसतानाही मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार, हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत महायुतीचे संख्याबळ असूनही त्यांना गप्प बसावे लागेल.

दुसरीकडे, जर हे आरक्षण 'खुल्या प्रवर्गा'साठी किंवा चक्राकार पद्धतीने निघाले, तर मात्र भाजप आणि शिंदे गटाचे पारडे जड होईल. अशा परिस्थितीतही पडद्यामागे वेगळ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने, शिंदे गटाला अडीच वर्षे महापौरपद देण्यापेक्षा, भाजप एका वर्षासाठी उद्धव ठाकरेंच्या सेनेला हे पद देऊन राजकीय 'तह' करू शकते, अशीही एक कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदेंची वाढती ताकद रोखण्यासाठी भाजप असा धक्कातंत्राचा वापर करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणाऱ्या या सोडतीत केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील 29 महानगरपालिकांचे भवितव्य ठरणार आहे. उमेदवारांची नावे नंतर जाहीर होतील, पण आरक्षणाचा प्रवर्ग कोणता निघतो, यावरच अर्धी लढाई जिंकली जाणार आहे. त्यामुळे आजचा गुरुवार उद्धव ठाकरेंसाठी 'गुरुकिल्ली' ठरणार की महायुती आपली सत्ता कायम राखणार, याचा फैसला काही तासांतच होणार आहे. मुंबईकरांसाठी आणि राजकीय विश्लेषकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्कंठावर्धक असणार आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis: बळीराजाला मिळणार 24 तास वीज; 16 हजार मेगावॅट सौर ऊर्जा योजनेची मुख्यमंत्र्यांची दावोस मधून घोषणा


सम्बन्धित सामग्री