नागपूरात बंद खाणीत सापडले 5 जणांचे मृतदेह (प्रतिकात्मक प्रतिमा)
Edited Image
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. कुही तहसीलमधील सुरगावमध्ये सोमवारी एका जुन्या बंद खाणीत पाच जणांचे मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली. मृतांमध्ये एक पुरूष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. रविवारपासून हे पाचही जण बेपत्ता होते.
प्राप्त माहितीनुसार, रोशनी चंद्रकांत चौधरी (32 वर्षे), मोहित चंद्रकांत चौधरी (12 वर्षे), लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (10 वर्षे), रज्जो राऊत (25 वर्षे) आणि इतिराज अन्सारी (20 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व लोक रविवारपासून बेपत्ता होते. त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूर शहरातील तहसील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
हेही वाचा - Jalna Murder Case: डबल मर्डरने जालन्यातील बदनापूर हादरले
नागपूरात बंद खाणीत सापडले 5 मृतदेह -
सोमवारी दुपारी पोलिसांना सुरगाव येथील एका बंद खाणीत काही मृतदेह दिसत असल्याची माहिती मिळाली. याबाबत माहिती मिळताच कुही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारी 1.0 ते 4.0 च्या दरम्यान खाणीतून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाच जणांचे मृतदेह एकत्र आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा - पेन्शनसाठी मुलानेच आईच्या डोक्यात मारला कुकर; नेमकं घडलं काय?
पोलिसाकडून तपास सुरू -
या संपूर्ण प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. ही घटना अपघात आहे, आत्महत्या आहे? की हत्येचा कट आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. तथापि, पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.