Sharad Pawar: प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय राजकारणात आणि समाजकारणात पाऊल ठेवले आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असून, 2026 ते 2029 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी तेच संस्थेची धुरा सांभाळणार आहेत.
निवड बिनविरोध, पवारांचा 'रयत' पॅटर्न
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदासाठी केवळ शरद पवार यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची ही निवड एकमताने करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आणि रयत सेवकांनी जल्लोष केला. राज्यसभेच्या शपथविधीनंतर प्रकृती बिघडल्यामुळे पवार विश्रांतीवर होते, मात्र साताऱ्यातील या कार्यक्रमाने त्यांच्या सार्वजनिक कामाचा नवा श्रीगणेशा झाला आहे.
रयत आता जगाशी जोडली जाणार
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना शरद पवार यांनी संस्थेच्या आगामी वाटचालीबद्दल अत्यंत आधुनिक दृष्टिकोन मांडला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणील की, "जग वेगाने बदलत आहे. खेड्यातील मुले आता AI बद्दल बोलत आहेत, ही आनंदाची बाब आहे. रयत शिक्षण संस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून जागतिक स्तरावर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे." दरम्यान, रयतच्या विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी टाय-अप (करार) करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर स्कॉलरशिप दिली जाणार असून, संस्थेच्या हितचिंतकांनी दिलेल्या देणग्यांबद्दल त्यांनी आभार मानले.
हेही वाचा - West Bengal Oath Ceremony: पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर! सुवेंदू अधिकारींनी स्वीकारली मुख्यमंत्रीपदाची धुरा; 'या' दिग्गज मंत्र्यांचाही शपथविधी
आव्हानांचा पाढा आणि कर्मवीरांचा वारसा
पवार यांनी आपल्या भाषणात आत्मपरीक्षणावरही भर दिला. "आपण कुठे कमी पडलो आणि नवीन काय करता येईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सामान्य माणसासाठी दिलेला आदर्श आम्ही पुढे नेत आहोत," असे सांगत त्यांनी संस्थेच्या प्रगतीत रयत सेवकांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी उद्योगपती रामशेठ ठाकूर यांनी संस्थेला 3 कोटी रुपयांचा भरीव निधी दिल्याचा उल्लेख करत पवारांनी त्यांचे विशेष आभार मानले.