Thursday, March 12, 2026 11:12:00 PM

Chandrapur Mayor Election: चंद्रपूर महानगरपालिकेचा ‘महापौर’ कोण? ठाकरेंच्या एका निर्णयाने काँग्रेस-भाजपची धाकधूक वाढली

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता स्थापन करणे अजूनही अधांतरी आहे.

chandrapur mayor election चंद्रपूर महानगरपालिकेचा ‘महापौर’ कोण ठाकरेंच्या एका निर्णयाने काँग्रेस-भाजपची धाकधूक वाढली

चंद्रपूर: 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची होताना दिसत आहे. 66 जागांच्या सभागृहात 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरूनही अंतर्गत दुफळी आणि मित्रपक्षांच्या अटींमुळे काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग खडतर झाला आहे. काँग्रेसमधील 'वडेट्टीवार विरुद्ध केदार' या गटांमधील वादाचा थेट फायदा तिसऱ्यालाच होण्याची चिन्हे दिसत असताना, उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र 'किंगमेकर'च्या भूमिकेत ताठ उभी राहिली आहे. सत्तेच्या या सारीपाटात भाजपने अनपेक्षित चाली रचल्याने आता चंद्रपूरच्या राजकारणात सस्पेन्स शिगेला पोहोचला आहे.

भाजपने संख्याबळाची गोळाबेरीज करत उमेदवार संगीता खांडेकर यांच्यासाठी अधिकृत 'व्हीप' जारी केला आहे. मात्र, केवळ व्हीपवर न थांबता भाजपने उद्धव सेनेला 'सव्वा-सव्वा वर्षे महापौरपद' देण्याची दिलेली मोठी ऑफर काँग्रेसची झोप उडवणारी ठरली आहे.

सत्तेसाठी भाजपने लवचिकता दाखवल्याने, आता उद्धव सेनेचा कल कोणाकडे झुकणार, यावरच महापालिकेचे भवितव्य अवलंबून आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरताना दिसत आहेत.

हेही वाचा: Sunetra Pawar : फडणवीसांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत घेणार अमित शाहांची घेणार भेट, विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता 'महापौर पदापेक्षा कमी काहीच नको' असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसकडून त्यांना 'परभणी फॉर्म्युल्या'ची (परभणीत काँग्रेसने केलेली मदत) आठवण करून दिली जात असली तरी, उद्धव सेनेचे स्थानिक नेते मात्र चंद्रपूरच्या अस्मितेसाठी महापौरपदावर ठाम आहेत. "हातचे सोडून पळत्याच्या पाठी धावू नका," असा सल्ला राजकीय विश्लेषक काँग्रेसला देत आहेत, कारण बहुमताच्या अगदी जवळ असूनही केवळ समन्वयाअभावी सत्ता गेली, तर ती काँग्रेससाठी मोठी नामुष्की ठरणार आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांनी मैदानात उतरून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 'बार्गेनिंग पॉवर' ओळखली आहे. भाजपची सव्वा वर्षांची ऑफर आणि उपमहापौर पदाचा प्रस्ताव यामुळे उद्धव सेनेचे पारडे जड झाले आहे. जर ही युती आकाराला आली, तर चंद्रपुरात एक वेगळेच राजकीय समीकरण पाहायला मिळू शकते, जे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरेल.

महापौर निवडणुकीच्या या रणधुमाळीत आता संपूर्ण राज्याचे लक्ष चंद्रपूरकडे लागले आहे. एका बाजूला भाजपची आक्रमक खेळी आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसपुढील अस्तित्वाची लढाई, अशा कात्रीत उद्धव सेना कोणाला साथ देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बैठकांचा ससेमिरा सुरूच आहे, पण महापौरपदाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गडद होत चालला असून, शेवटच्या क्षणी होणारी 'ठाकरे' स्टाईल गुगली सत्तेचे समीकरण बदलू शकते.

हेही वाचा: Weather Update : होळीच्या आधीच स्वेटरची सुट्टी; पुढील 4 ते 5 दिवसात हवामानात मोठे फेरबदल


सम्बन्धित सामग्री