चंद्रपूर: सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर महापौरपदासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. सत्ता स्थापन कोण करणार, यासाठी विविध पक्षांमध्ये युतीची गणिते आणि आकड्यांची जुळवाजुळव सुरू असतानाच, चंद्रपूर महानगरपालिकेतून काँग्रेससाठी अडचणीची ठरणारी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुका पार पडल्या असल्या तरी, काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता उघडपणे समोर येऊ लागला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद सध्या चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असून, याचा थेट परिणाम पक्षाच्या स्थानिक संघटनेवर होत असल्याचे चित्र आहे.
कालच आमदार विजय वडेट्टीवार यांनी “झालं गेलं गंगेला मिळालं” असे सूचक वक्तव्य करत, धानोरकर यांच्याशी असलेला वाद बाजूला ठेवून पक्षासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र, याला उत्तर देताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप करत, काँग्रेसच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना पळवून नेण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता. या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
हेही वाचा: BMC Mayor: ठाकरेंच्या मनातलं देवाभाऊंच्या ओठावर? डाव फसला; मुंबईच्या महापौर पदासाठीचं सगळंच चित्र पलटणार?
या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal हे या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाढता तणाव थांबवून पक्षातील फूट टाळण्याचा प्रयत्न सपकाळ करणार असल्याची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधि अन्वर शेख यांच्याकडून मिळाली आहे. मात्र, हा वाद मिटवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही तीव्र नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः प्रतिभा धानोरकर यांच्या भूमिकेबाबत अनेक कार्यकर्ते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. अंतर्गत मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू राहिल्यास त्याचा फटका महापौरपदाच्या राजकारणात काँग्रेसलाच बसू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या निर्णायक टप्प्यावर काँग्रेससमोरील हा अंतर्गत संघर्ष पक्षासाठी डोकेदुखी ठरत असून, येत्या काही दिवसांत वरिष्ठ नेतृत्व कोणती भूमिका घेते, यावर चंद्रपूरमधील राजकीय समीकरण ठरणार आहे.
हेही वाचा: Mumbai University : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 ते 7 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं; जाणून घ्या परिक्षांच्या नवीन तारखा