अमरावती: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुटाने हल्ला केला. त्यामुळे, देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेप्रकरणी, सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बंधूंनीही तीव्र निषेध नोंदवले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याबाबत भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई आणि बहीण क्रीती गवई यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.
'कायदा हातात घेऊन देशात असुरक्षितता किंवा अव्यवस्था वाढवण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रत्येक व्यक्तींनी आपल्या मनात असलेल्या प्रश्नांना शांतपणे आणि हिंसाचार न करता सोडवण्याची गरज आहे', अशी प्रतिक्रिया भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी दिली. यासह, भूषण गवई यांच्या बहीण क्रीती गवई म्हणाल्या, 'सर्वोच्च न्यायालयात झालेला हल्ला खरंच खूप लज्जास्पद आहे. तसेच, कायद्याच्या विरोधात जाणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कुठेही धक्का पोहोचू नये, यासाठी निदर्शने शांततेत करण्यात यावे'.
हेही वाचा: UNSC Open Debate: पाकिस्तान पुन्हा Expose! पाक सैन्याचा 4 लाख महिलांवर सामूहिक अत्याचार; संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताकडून पर्दाफाश
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात हल्ला झाला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की, 'भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी मी संवाद साधला. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतातून तीव्र प्रतिसाद उमटत आहे. अशा लज्जास्पद कृत्यांना आपल्या समाजात कोणतीही जागा नाही. इतकंच नाही, तर ही घटना खरंच खूप निंदनीय आहे. अशा गंभीर परिस्थितीतही सरन्यायाधीश भूषण गवई शांत आणि संयमी आहेत, याचं मला कौतुक वाटतं'.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी वकील राकेश तिवारींनी (वय: 71) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुटाने हल्ला केला. खजुराहो मंदिर संकुलातील विष्णू देवांच्या मुर्तीच्या जीर्णोद्वारासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विधान केले. भूषण गवई यांनी केलेल्या विधानावर आरोपी वकील राकेश तिवारीं संतुष्ट नव्हते. म्हणून, त्यांनी भर सर्वोच्च न्यायालयात भूषण गवई यांच्यावर बूट फेकला. यादरम्यान, त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, ज्यात राकेश तिवारींनी लिहिले होते की, 'माझा देश सनातनींचा आहे. भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'. या घटनेनंतर, बार कॉन्सिल ऑफ इंडियाने आरोपी वकील राकेश तिवारींना नोटीस बजावून त्यांना वकिली करण्यास मनाई केली आहे.