मुंबई: नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी घणाघात टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत भरगोस मतांनी विजय मिळवण्यासाठी भाजपने 'मॅच-फिक्सिंग' केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखाद्वारे उत्तर दिले आहे. 'जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात', असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. सोबतच, फडणवीसांनी राहुल गांधींना इशारा देत म्हणाले की, 'जनादेशाचा अपमान कराल तर जनता माफ करणार नाही'.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
'7 जून रोजी सकाळी गडचिरोलीहून नागपूरला परतत असताना पत्रकारांनी मला सांगितले की ''राहुल गांधींनी एक लेख लिहिला आहे''. मी पत्रकारांना विचारलो, ''कशावर लिहिला आहे?''. तेव्हा पत्रकार म्हणाले, ''महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुक''. खरं तर हा विषय उगाळून आता जुना झाला आहे. निवडणूक आयोगाने तर वेळोवेळी राहुल गांधींना उत्तरेही दिली. मात्र, ती उत्तरे न वाचताच राहुल गांधींना लेखक होण्याची खुमखुमी आली असेल, तर माझ्या त्यांना शुभेच्छा. एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकत आहोत? जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडत आहे? त्यासाठी काय केले पाहिजे? जर याचा विचार केला तर ते अधिक प्रभावी ठरेल. बाकी या लेखाला अनुल्लेखानेच उत्तर द्यायला हवे. पण, एक तत्त्व आहे, तुम्ही लोकांना 'कन्व्हिन्स' करू शकत नसाल, तर त्यांना 'कन्फ्यूज' करा. तेच काम राहुल गांधी वारंवार करीत आहेत. त्यामुळे, आपल्याला शक्य तितक्या वेळा वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी काम करत राहावे लागेल', असं देवेंद्र फडणवीसांनी लेखात नमूद केलं आहे.
हेही वाचा: 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग'; राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर
मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
पहिला मुद्दा: 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही, असा टोला
दुसरा मुद्दा: मतदारवाढीचा: विधानसभा निवडणुकीत 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर 60 पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे.
जुनी आकडेवारी:
2014 ते 2019 या काळात: 63 लाख नवीन मतदार, 2009 ते 2014 या काळात: 75 लाख नवीन मतदार, 2004 ते 2009 या काळात: 1 कोटी नवीन मतदार. म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजीबात नाही.
लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले?
2004 : लोकसभेपेक्षा विधानसभेत 5% अधिक आहे, 2009 मध्ये 4% अधिक आहे, 2014 मध्ये 3% अधिक आहे, 2019 मध्ये 1% अधिक आहे, 2024 मध्ये 4% अधिक आहे. त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीही नवीन घडले असे नाही.
तिसरा टप्पा - अधिक मतदानाचा:
1 - दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी 5.83% इतके मतदान
2 - त्यामुळे शेवटच्या 1 तासात 7.83% इतकी वाढ झाली आहे, असे सांगून आपण काय नवीन सांगतो आहोत?
3 - सायं. 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधी माहिती नाही काय?
4 - फडणवीसांच्या कार्यालयाने ‘लोकसत्ता’ मध्येच 3 डिसेंबर 2024 रोजी लिहिलेल्या लेखाचा दिला संदर्भ
5 - 2024 च्या लोकसभेच्या दुसर्या टप्प्यात सायं. 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96% इतकी, जी दुसर्या दिवशी 66.71% इतकी अंतिम झाली. यातील वाढ 5.75 टक्के इतकी होती.
पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का?
चौथा टप्पा - अर्धवटपणाचा:
1 - यात राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, 'केवळ 85 मतदारसंघात 12 हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्या. सायंकाळी 6 नंतर झालेले मतदान हे 17 लाख 70 हजार 867 इतके आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, 1 लाख 427 मतदानकेंद्रावर प्रतिमिनिट 97,103.32 इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायंकाळी 6 नंतर झाले आहे, त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटे 23 सेकंंद इतका होता.
2 - ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदार टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे.
पाचवा अर्थहीन मुद्दा:
1 - राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात.
2 - सातत्याने जनादेशाचा अपमान करतात.
3 - जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार.
4 - आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात? यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज.
5 - सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करुन आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे.
6 - महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने महाराष्ट्रातील शेतकर्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी याचा कायमच निषेधच करीन.