Sunday, July 13, 2025 10:09:42 AM

धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार आहे.

धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पालघर: देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यातील मनोर येथे करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. धरती आबा योजनेंतर्गत गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीज, प्रत्येक घरात गॅस जोडणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, माता कल्याण, पोषण आहार अशा एकूण 25 योजना धरती आबा योजनेच्या माध्यमातून लागू करण्यात येणार आहेत. ज्या गावांमध्ये 500 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे तसेच ज्या गावात 50 टक्के पेक्षा जास्त आदिवासी समाज राहतो अशा गावांचा समावेश या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, गडचिरोली यांसह इतर दोन जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये 50 आदिवासी लोकसंख्या असेल तरी ते गाव धरती आबा योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : घरगड्याची संपत्ती मालकापेक्षा जास्त; उद्धव ठाकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

वैयक्तिक पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीस तर सामूहिक पद्धतीमध्ये आदिवासी समूहाचा या योजनेमध्ये विचार करण्यात येणार असून  17 विभागाच्या 25 विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनेंतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आदिवासी समाजामध्ये धरती आबा योजनेमुळे परिवर्तन होणार असून आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी ही मोठी संधी आहे. भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असे म्हटले जात असे. पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रज राजवटीविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांनी बंड करून आदिवासी समाजाला न्याय दिला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 
 


सम्बन्धित सामग्री