मुंबई: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या ‘मेट्रो लाईन 8’ मार्गिकेचा सुधारित आराखडा सिडकोने तयार केला असून, यामध्ये आता लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) मेट्रो स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
पूर्वी केवळ दोन विमानतळांदरम्यानची ही मेट्रो सेवा आता मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे टर्मिनसशी जोडली जाणार आहे. LTT मेट्रो स्थानक जोडल्यामुळे मुंबईतील स्थानिक प्रवासी तसेच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांत प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दुवा निर्माण होणार आहे. सध्या LTT वरून फारशा गाड्या सुटत नसल्या तरी भविष्यात येथे रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये नैसर्गिक आपत्ती : मुसळधार पावसामुळे भूस्खलन; 3 मृत, 1 जण बेपत्ता
337 किमीच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाची कडी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) 337 किमी लांबीच्या मेट्रो नेटवर्कमध्ये ‘मेट्रो 8’ ही एक महत्त्वाची लिंक आहे. या मार्गिकेच्या उभारणीसाठी सुरुवातीला MMRDA आणि सिडकोने संयुक्तपणे जबाबदारी घेतली होती. मात्र, 27 जानेवारी 2025 रोजी नगर विकास विभागाने एक शासन निर्णय काढून या प्रकल्पाची उभारणी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण जबाबदारी सिडकोकडे सोपवली.
कशी असेल मेट्रो 8 एक्स्प्रेस लाईन?
मेट्रो लाईन 8 ही पूर्णतः भुयारी असेल. या मार्गाची एकूण लांबी सुमारे 35 किमी असून त्यातील 11.1 किमीचा भाग मुंबई विमानतळ ते मानखुर्ददरम्यान असेल. सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ हा विस्तार करणार आहे. घाटकोपर येथून अंधेरीपर्यंतचा काही भाग इस्टर्न एक्स्प्रेस हायवेखाली भुयारी असेल, तर घाटकोपर ते मानखुर्द हा मार्ग उन्नत असेल.
महत्त्व काय?
हा मेट्रो मार्ग केवळ दोन विमानतळ जोडणार नाही, तर मुंबईतील रेल्वे नेटवर्कलाही अधिक सशक्त करणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रोद्वारे जोडल्याने प्रवाशांना रेल्वे आणि मेट्रो यामध्ये जलद आणि सुलभ हस्तांतरण शक्य होईल. परिणामी, वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषण यामध्येही घट होईल.
‘मेट्रो 8’ प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगतो. सिडकोकडून तयार करण्यात आलेला सुधारित आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.