महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज, शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत आहे. राज्याच्या राजकीय पटलावर 'मिनी विधानसभा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी मतदान होत असून, एकूण 7,438 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचा- Sindhudurg Zilla Parishad Election 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद-पंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात; जाणून घ्या जिल्ह्यातील प्रमुख लढती आणि बदलती समीकरणे
अशातच आज परभणीमध्ये अंधश्रद्धेचा एक प्रकार समोर आला आहे. मतदान सुरु होण्याअगोदर उमेदवारांनी मतदानकेंद्राबाहेर नारळ फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदानकेंद्राबाहेर एक व्यक्ती नारळ फोडताना आणि त्यानंतर ते फोडलेलं नारळ मतदानकेंद्राबाहेरून ओवाळून टाकल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेरील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. परभणीमधून ही दुसरी धक्कादायक घटना समोर येत आहे. त्यापुर्वी परभणीत महंतांनी मतदानकेंद्राबाहेर गोंधळ घातला होता. त्याच वेळेस परभणीमधील दुसऱ्या एका मतदान केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. खरं तर अशा प्रकारच्या प्रशासकीय कामामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही श्रद्धा-अंधश्रद्धेचा करायचा नसतो. त्यामुळे हा नियमांचा उल्लंघन केल्याचा प्रयत्न असून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.