MNS on Harshvardhan Sapkal: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात संतापाची लाट उसळली आहे. या विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) आक्रमक पवित्रा घेत सपकाळ यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.
मनसेचा तीव्र निषेध आणि माफीची मागणी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या या विधानाला मनसेने 'अत्यंत निंदनीय' म्हटले आहे. मनसेच्या अधिकृत भूमिकेत असे स्पष्ट करण्यात आले आहे की, "शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानाने महाराष्ट्राची आणि जगभरातील शिवप्रेमींची मने दुखावली आहेत. त्यांनी या प्रकरणी शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी." मनसेने या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा - Bawankule on Harshvardhan Sapkal: 'हर्षवर्धन सपकाळ यांचा मेंदू तपासावा लागेल...'; चंद्रशेखर बावनकुळेंची जहरी टीका
प्रवीण दरेकर यांचा प्रहार: 'हा निव्वळ मूर्खपणा'
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या वादात उडी घेत सपकाळ यांच्या बुद्धिमत्तेवरच शंका उपस्थित केली आहे. दरेकर म्हणाले की, "हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला हा प्रकार निव्वळ मूर्खपणा आहे. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कशी काय केली जाऊ शकते? ही तुलना करणे म्हणजे इतिहासाचे अज्ञान प्रदर्शन करणे आहे." सपकाळ यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचेही दरेकर यांनी यावेळी नमूद केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांना जाब विचारण्याचे आवाहन
प्रवीण दरेकर यांनी केवळ निषेध न नोंदवता थेट काँग्रेस पक्षाकडे सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "काँग्रेसने तातडीने हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घ्यावा. तसेच, काँग्रेसच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनीच आता आपल्या नेत्याला या विधानाबद्दल जाब विचारला पाहिजे आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणला पाहिजे," असे आवाहनही दरेकर यांनी केले आहे.लया प्रकरणामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महापुरुषांच्या मुद्द्यावरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.