अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शंकर भारती व शहर कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर कलवले या दोन अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोघांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्वराज्य पक्षाने निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली होती. याची दखल घेत लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने डॉ. शंकर भारती यांचे लातूर महापालिकेतील कामकाजाचे आदेश रद्द करत त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना किर्दक-भोसले यांनी मागील सहा महिन्यात डॉ. भारती यांची केलेली ही दुसरी बदली आहे.
हेही वाचा: गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप; आर के फाउंडेशन ट्रस्ट व रूपेन टण्णा ट्रस्ट यांचा उपक्रम
लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील डॉ.शंकर भारती व रामेश्वर कलवले यांच्या अनागोंदी, नियमबाह्य कामकाजाची तक्रार स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती. निवेदनानंतर आरोग्य उपसंचालक अर्चना किर्दक-भोसले यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर आरोग्य उपसंचालकांनी डॉक्टर शंकर भारती यांचे लातूर शहर महानगरपालिकेतील कामकाजाचे आदेश रद्द करून त्यांची कुष्ठरोग सहाय्यक संचालक कार्यालयात बदली केली आहे. सदरील बदलीनंतर तात्काळ रुजू होण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकाच्या पत्रात असताना दोन महिने उलटले तरी डॉ.शंकर भारती हे कुष्ठरोग सहाय्यक संचालक कार्यालयात अद्याप रुजू झाले नसल्याचे कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. विद्या गुरुडे यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ.शंकर भारती यांची यापूर्वी आरोग्य उपसंचालकांनी दि. 27 फेब्रुवारी, 2025 रोजी अहमदपूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात बदली केल्याचे आदेश निर्गमित केले होते. परंतु त्या आदेशाला न जुमानता डॉ.भारती हे लातूर शहर महानगरपालिकेतच कार्यरत होते. आता कुष्ठरोग सहाय्यक संचालकांच्या कार्यालयात तात्काळ रुजू होण्याचे आदेश आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना किर्दक-भोसले यांनी दि. 9 एप्रिल, 2025 रोजी काढले असताना डॉ.शंकर भारती अद्याप रुजू झाले नाहीत. आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना किर्दक-भोसले यांच्या आदेशाला डॉ.भारती का जुमानत नाहीत? याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे डॉ.शंकर भारती व रामेश्वर कलवले यांना अभय देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.