मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून सीमाशुल्क विभागाने परदेशी चलन आणि मौल्यवान हिरे जप्त केले. आरोपींकडून जप्त केलेल्या हिऱ्यांची किंमत 1.7 कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई कस्टम विभाग-3 च्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की एक संशयास्पद प्रवासी दुबईला परदेशी चलन आणि हिरे घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे, मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. हा प्रवासी एका नामांकित कंपनीच्या विमानाने मुंबईहून दुबईला रवाना होणार होता. त्याच्या प्रवासाची झडती घेतली आणि त्याच्या बॅगेची तपासणी केली.
तेव्हा त्याच्याकडून 50 सौदी रियाल, ज्याची भारतीय रुपयात किंमत 11 लाख 15 हजार इतकी होती, तसेच कृतिम हिरे, ज्याची भारतीय किंमत 46 लाख 22 हजार 450 रुपये होती, आणि नैसर्गिक हिरे, ज्याची किंमत 1 कोटी 23 लाख 72 हजार 450 रुपये होती, असा एकूण 1 कोटी 70 लाख रुपयांचा मुद्देमाल कस्टम अधिकाऱ्यांना सापडला.
तपासादरम्यान, आरोपीच्या काळ्या बॅगेत सौदी रियाल आढळले. तसेच, आरोपीने तीन लिफाफ्यांमध्ये हिरे लपवले होते आणि ते लिफाफे त्याच्या शरीरावर चिकटवले होते. या प्रकरणात सर्व संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या असून, पुढील तपास सुरू आहे.