Thursday, February 12, 2026 06:23:46 PM

Rajesh Tope On Ajit Pawar : 'दादा म्हणजे वडीलधारा भाऊ अन् मार्गदर्शक...'; राजेश टोपे भावून होऊन सांगितल्या अजित पवारांसोबतच्या आठवणी

माजी आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते राजेश टोपे यांना आपले अश्रू अनावर झाले. अत्यंत भावूक होत त्यांनी अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

rajesh tope on ajit pawar  दादा म्हणजे वडीलधारा भाऊ अन् मार्गदर्शक राजेश टोपे भावून होऊन सांगितल्या अजित पवारांसोबतच्या आठवणी

Rajesh Tope On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच माजी आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते राजेश टोपे यांना आपले अश्रू अनावर झाले. अत्यंत भावूक होत त्यांनी अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र याव्यात, यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील होतो आणि दादांनाही तशी विनंती केली होती, असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

विमान अपघाताची पहिली बातमी आणि तो धक्का
राजेश टोपे यांनी सांगितले की, या घटनेची माहिती त्यांना टीव्ही चॅनेलपेक्षाही आधी मिळाली. "आमच्या तालुक्यातील एक मुलगा बारामती एअरपोर्टच्या स्टोअर विभागात काम करतो. त्याने सकाळी साडेसातच्या सुमारास मला फोन केला. 'दादांच्या प्लेनचा एक्सीडेंट झाला आहे, सगळं प्लेन भस्मसात झालंय' हे ऐकल्यावर माझा स्वतःवर विश्वासच बसला नाही. त्यानंतर काही वेळातच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची अपरिमित हानी आहे," असे टोपे म्हणाले.

कर्तबगार आणि शिस्तप्रिय नेतृत्व
अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना टोपे म्हणाले की, दादा म्हणजे शिस्त, वक्तशीरपणा आणि कर्तबगारीचा संगम होता. "आम्ही अनेक नेते बघितले, पण सकाळी 7 वाजता मीटिंग म्हणजे ७ वाजताच सुरू होणार, असा नेता फक्त अजित दादाच असू शकतात. रोखठोक बोलणे आणि दिलेला शब्द पाळणे ही त्यांची ख्याती त्यांनी कार्यातून सिद्ध केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा एक अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक हित जाणणारा नेता हरपला आहे."

हेही वाचा - Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात! DGCA कडून अद्याप कोणालाही समन्स नाही; तपासाची सूत्रे आता AAIB कडे

मोठ्या भावाचा आधार हरपला
राजेश टोपे आपल्या वैयक्तिक नात्याबद्दल बोलताना म्हणाले की, "माझ्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यावर दादांनी मला वडिलांसारखा आणि मोठ्या भावासारखा आधार दिला. आयुष्यात काय चांगले, काय वाईट याचे मार्गदर्शन ते प्रामाणिकपणे करायचे. माझ्या सर्व संस्थांचे उद्घाटन दादांच्याच हस्ते झाले होते. संकटकाळी कसे खंबीर राहायचे, हे त्यांनीच आम्हाला शिकवले. आज मी माझा मार्गदर्शक गमावला आहे."

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचे राहिले स्वप्न
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी राजेश टोपे यांची इच्छा होती. "मी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्नशील होतो. दादांनाही मी तशी विनंती करत होतो. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते," असे म्हणत टोपे यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांनी आपली आणि दादांची शेवटची भेट कृषी प्रदर्शनादरम्यान झाली होती, याची आठवणही यावेळी सांगितली.


सम्बन्धित सामग्री