पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच पुण्यातील हडपसर परिसरात देवकी प्रसाद पुजारी (वय 22) या विवाहितेने हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुंडा न मिळाल्याने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून देवकीने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी पतीसह सासू-सासरे आणि दीर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकी हिचा विवाह 18 एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडी येथील बसव मंगल कार्यालयात प्रसाद चंद्रकांत पुजारी याच्याशी झाला होता. लग्नात देवकीच्या वडिलांनी चार तोळे सोने आणि मानपानानुसार 10 लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात आल्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिला हुंडा कमी दिल्याचा आणि भांडी, फ्रीज आदी सामान न दिल्याचा राग ठेवून शिवीगाळ व मानसिक त्रास दिला जात होता.
हेही वाचा: Vaishnavi Hagwane case : सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी नणंद करिश्मा हगवणे यांचे घनिष्ठ संबंध?
देवकीने हा त्रास सहन न करता वडिलांना सर्व हकीगत सांगून माहेरी परतली होती. मात्र तिच्या सासऱ्याने समजूत घालून तिला पुन्हा पुण्यात आणले. 18 मे रोजी देवकीने वडिलांना फोन करून रडताना सांगितले की, पती प्रसाद, दीर प्रसन्न, सासू सुरेखा आणि सासरे चंद्रकांत पुजारी हे तिला शिवीगाळ व मारहाण करत आहेत. तिच्या वडिलांनी तिची समजूत काढत लवकरच पुण्यात येतो असे सांगितले. पण त्याच्यानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी 19 मे रोजी देवकीने हडपसर येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा हुंडा प्रथेसंदर्भातील गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात देवकीचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सतत विवाहित महिलांवरील हुंड्यासाठी होणारा छळ, मानसिक आणि शारीरिक त्रास यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर काही दिवसांतच घडलेली ही दुसरी घटना प्रशासन आणि समाजासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.