Navi Mumbai Airport: प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMI) आता विमानसेवेचा मोठा विस्तार होत आहे. येत्या 29 मार्च पासून इंडिगो (IndiGo) कंपनी सहा महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार असून, यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कनेक्टिव्हिटी वाढणार: 'या' शहरांसाठी उड्डाणे
नवी मुंबई विमानतळ आता देशातील टियर-2 आणि टियर-3 शहरांशी थेट जोडले जाणार आहे. यामध्ये अहमदाबाद, राजकोट, दीव, कोल्हापूर आणि बेळगाव आणि गोवा या शहरांचा समावेश आहे. ही सर्व उड्डाणे ATR विमानांच्या सहाय्याने चालवली जाणार असून, मार्च अखेरीस सुरू होणाऱ्या 'उन्हाळी वेळापत्रका'चा (Summer Schedule) हा एक भाग असेल.
विमानांचे संभाव्य वेळापत्रक
प्रवाशांच्या सोयीसाठी इंडिगोने काही प्रमुख मार्गांच्या वेळा जाहीर केल्या आहेत:
अहमदाबाद: दररोज संध्याकाळी 7.10 वाजता अहमदाबादहून सुटणारे विमान रात्री 8.40 वाजता नवी मुंबईत उतरेल. परतीचा प्रवास रात्री 9.10 वाजता सुरू होईल.
राजकोट: नवी मुंबईहून सकाळी 7.00 वाजता उड्डाण होईल, तर परतीचे विमान सकाळी 8.45 वाजता झेपावेल.
दीव: नवी मुंबईतून सकाळी 10.05 वाजता प्रस्थान करून हे विमान 11.15 वाजता दीवला पोहोचेल.
विशेष नोंद: कोल्हापूर आणि बेळगाव या शहरांच्या विमानसेवेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.
हेही वाचा - Mumbai Metro Line 8: दोन विमानतळं आता मेट्रोने जोडणार! मुंबई मेट्रो 'लाईन 8' ला राज्य सरकारची अधिकृत मंजुरी; असा असेल प्रकल्प
24 तास सेवा आणि भविष्यातील विस्तार
25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळाने अल्पावधीतच मोठी प्रगती केली आहे. 1 फेब्रुवारी पासून येथे 24 तास विमान उड्डाणे सुरू झाली असून, आता विमानांच्या संख्येतही वाढ करण्यात येत आहे. केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे, तर लवकरच येथून 'मालवाहतूक सेवा' (Cargo Services) देखील सुरू होणार असून, यामुळे व्यवसाय आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.