ठाणे: ठाण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरात क्रिकेट सामन्यावरून झालेल्या भांडणात एका 20 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. शिवम करोतिया असं मृत तरुणाचं नाव आहे. शिवम वागळे इस्टेटमध्ये राहत होता. क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादावरून शिवमच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच शिवमचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वागळे इस्टेटमधील साठेवाडी येथील ज्ञानसाधना कॉलेजजवळ घडली. 16 वर्षीय भावेश करोतिया हा रवी शर्मा (19) या स्थानिक मुलांसह क्रिकेट खेळत असताना वाद झाला. भावेश आणि रवी यांच्यात हाणामारी झाली. त्यादरम्यान रवीने भावेशवर हल्ला केल्याचा आरोप आहे. भावेशच्या कुटुंबीयांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.
हेही वाचा - लातुरात 20 लाखांसाठी अर्पिताचा हुंडाबळी
दरम्यान, ज्ञानसाधना कॉलेजजवळ काही वेळातच दुसरा वाद झाला. यावेळी, भावेशचे दोन्ही भाऊ शिवम आणि साहिल यांनी रवीचा मित्र तनिश हेमेंद्र सिंग याच्याशी वाद घातला. हाणामारीदरम्यान तनिशने शिवमच्या पाठीवर चाकूने वार केले. गंभीर अवस्थेत शिवमला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी शिवमला मृत घोषित केले.
हेही वाचा - जामखेडमध्ये लघुशंकेवरून वाद; तिघा अज्ञातांकडून गोळीबार, युवक जखमी
या संपूर्ण घटनेनंतर कॉलेजच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मुलाची हत्या करण्यात आल्याने शिवमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तथापी, पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी सोमवारी या घटनेची पुष्टी केली.