मुंबई : शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ई-ट्रान्सीट सुरू करण्याविषयी हेस-एजी (HESS-AG) कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.
ई-ट्रान्सीट प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंपनीने त्यांची उत्पादने भारतात तयार करावीत, जेणेकरुन उत्पादन खर्च कमी होऊन प्रकल्प खर्चातही बचत होईल. कमी किंमतीमध्ये एक चांगली शहर वाहतूक व्यवस्था कंपनीने उपलब्ध करून दिल्यास राज्यातील किमान 10 शहरांसाठी असे प्रकल्प उभारता येतील. त्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-ट्रान्सीट बसेसचे उत्पादन देशातच सुरू करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्याविषयी सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
हेही वाचा : Tahawwur Rana NIA Custody: तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या वापरत असलेल्या ई-बस, मेट्रो आणि ई-ट्रान्सीट यांच्या आर्थिक आणि इतर सर्व बाजू एकत्र विचारात घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करावा. एक चांगला आणि व्यवहार्य प्रस्ताव कंपनीने द्यावा. मेट्रोसोबत आणखी एक पर्याय सध्या शहरांसाठी गरजेचा आहे. तो या ई-ट्रान्सीट सुविधेतून उपलब्ध होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मेट्रो, बस रॅपीड ट्रान्सीट (बीआरटी) यांना एकत्र करून एक हाय कपॅसिटी मास ट्रान्सीट रुट (एचसीएमटीआर) अशा वेगवान नागरी वाहतूक सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत आज ई-ट्रान्सीट सुविधा या पर्यायावर सविस्तर चर्चा करण्यात आली.