Election Campaign Deadline: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज (13 जानेवारी) प्रचाराचा शेवटचा दिवस असून, सायंकाळी 5:30 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपत आहे. मात्र, प्रचार संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पत्रक काढून सर्व राजकीय पक्षांना सतर्क केले आहे. मुदत संपल्यानंतर टीव्ही, वर्तमानपत्रे किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणूकविषयक जाहिराती दाखवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
आयोगाचा '48 तासांचा' कडक नियम
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, कायद्यानुसार मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तास आधी 'सायलेन्स पिरियड' (शांतता काळ) सुरू होतो. आज सायंकाळी 5:30 नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया (TV), मुद्रित माध्यमे (वृत्तपत्रे) आणि इतर कोणत्याही प्रसारमाध्यमांतून उमेदवारांचा प्रचार किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यास मनाई असेल. जाहिरातींच्या पूर्वप्रमाणनाचे सर्व अधिकार आता निवडणूक आयोगाच्या संनियंत्रण समितीकडे असतील आणि मुदतीनंतर अशा कोणत्याही परवानग्या दिल्या जाणार नाहीत.
हेही वाचा -Ravindra Chavan: लुंगीवरून राजकीय घमासान! राऊतांच्या पोस्टनंतर चव्हाणांचं ‘जशास तसे’ उत्तर, आदित्य ठाकरेंचा ‘तो’ फोटो समोर
उमेदवारांसाठी सुचना
दरम्यान, निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी उमेदवारी अर्जासंदर्भात काही तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला आहे. उमेदवाराचे नाव त्या महानगरपालिकेच्या कोणत्याही वॉर्डातील मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या सूचक आणि अनुमोदकाचे नाव मात्र उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, त्याच प्रभागातील मतदार यादीत असणे गरजेचे आहे. एक उमेदवार जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्रे दाखल करू शकतो, परंतु त्याला एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढवता येईल.
हेही वाचा - ZP Election Announced : 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले, मतदान ते निकाल...; संपूर्ण माहिती क्लिकवर
मतदान कधी?
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या 48 तास आधी बाहेरच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संबंधित निवडणूक क्षेत्र सोडण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.