छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. धानोरा गावात विहिरीचं काम सुरू असताना अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने वडिलांसह दोन तरुण मुलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून काकडे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा गावातील काकडे कुटुंब आपल्या शेतात नवीन विहिरीचं काम करत होतं. शनिवारी रात्री विहिरीत साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी बाजीराव काकडे हे आपल्या दोन मुलांसह विहिरीजवळ गेले होते. यावेळी विहिरीच्या काठावरील माती अचानक खचली आणि मोठा ढिगारा थेट विहिरीत कोसळला. त्यामध्ये तिघेही मातीखाली दबले गेले.
या दुर्घटनेत बाजीराव सर्जेराव काकडे (वय ५५), आजिनाथ बाजीराव काकडे (वय २५) आणि शाम बाजीराव काकडे (वय २२) यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने मदतकार्य करताना मोठ्या अडचणी आल्या. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.काकडे कुटुंब गावात मेहनती आणि शांत स्वभावासाठी ओळखलं जात होतं. शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून विहिरीचं काम सुरू होतं. मात्र त्याच विहिरीने कुटुंबातील तिघांचा जीव घेतल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.