Ashish Shelar: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 'ठाकरे बंधूंच्या अज्ञानावर हसावं की रडावं हेच कळत नाही,' अशा खोचक शब्दांत शेलार यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
निवडणूक आयोगाच्या नियमांवरून जुंपली
राज ठाकरे यांनी आज सकाळी 'पाडू मशीन' आणि प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेण्याबाबत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'निवडणूक आयोगाने दिलेली ही सवलत अनेक वर्षांपासून आहे, त्यात नवीन काहीच नाही. पण या लोकांचे ज्ञान कमी पडते आहे. राज ठाकरे यांनी आता आपले राजकीय सल्लागार बदलण्याची गरज आहे, कारण त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे.' तसेच, निवडणुकीतील आपला निश्चित असलेला पराभव झाकण्यासाठी हे नेते आतापासूनच बहाणे शोधत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा - PADU Machine: PADU मशीन म्हणजे काय? राज ठाकरेंसह विरोधकांचा आक्षेप नेमका कशासाठी, बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर?
मुंबादेवी दर्शनावरून टोला
दरम्यान, आज ठाकरे बंधूंनी एकत्र येत मुंबादेवीचे दर्शन घेतले, यावरही शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "यापूर्वी हे दोन्ही बंधू कधी मुंबादेवीच्या चरणी एकत्र दिसले नाहीत. मग आजच ही आठवण का झाली? केवळ निवडणुकीसाठी ही भक्ती जागृत झाली आहे का?" असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार म्हणाले की, "ते मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या कुलस्वामिनीच्या मंदिरातील पायऱ्या साध्या दुरुस्तही केल्या नाहीत, आता त्यांना देवाची आठवण येत आहे."
हेही वाचा - BMC Election 2026 : 'ठाकरे बेस्ट' पोस्ट विरुद्ध 'महादेव' कार्ड; निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी रंगली सोशल मेडियावर चर्चा
तथापी, 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेलार यांच्या मते, विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते तांत्रिक बाबींवरून गदारोळ करत आहेत. मुंबईकर या सर्व प्रकरणाकडे लक्ष ठेवून असून, ते योग्य तो धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.