Saturday, June 14, 2025 04:54:52 AM

मासे पकडणे पडले महागात; दोन भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यु

पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई गावात एक धक्कादायक घटना घडली. मासे पकडण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मासे पकडणे पडले महागात दोन भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यु

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई गावात एक धक्कादायक घटना घडली. मासे पकडण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. ही घटना रविवारी दुपारी 2 च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या आगलावे गेवराई गावात घडली आहे. सतीश एकनाथ आगळे (वय: 18) आणि गौरव शिवाजी आगळे (वय: 16) अशी मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

कुटुंबातील सर्व व्यक्ती लग्नकार्यासाठी बालानगर येथे गेले असताना सतीश आगळे आणि गौरव आगळे हे दोघे सख्खे चुलत भाऊ घरी एकटेच असल्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या होणोबाडी वाडी शिवार गट (नंबर: 55) मधील शेततळ्यात मासे पकडण्यासाठी रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गेले होते. त्यांनी मासे पकडण्यासाठी जाळी फेकली. मात्र, जाळीत त्यांचा पाय गुंतल्यामुळे या जाळीत दोघे अडकले आणि पाण्याने भरलेल्या शेततळ्यात बुडाले.

घरातील सर्वजण लग्नाला गेले असल्यामुळे यावेळी शेतात कोणीही नव्हते. जेव्हा घरातील नातेवाईक लग्न समारंभावरून घरी आले, तेव्हा मुले न दिसल्याने त्यांनी मुलांना शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा काही नागरिकांनी, 'दोघे भाऊ मासे पकडण्याची जाळी घेऊन शेततळ्याकडे गेले आहेत', अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर, कुटुंबाने शेततळ्यात जाऊन पाहणी केली. शेततळ्यात मासेमारीचे जाळे टाकल्याचे आढळून आले आणि तेथे दोन्ही भावंडांचे चप्पल दिसून आले. जेव्हा या दोन्ही भावंडांचा शोध घेण्यास सुरुवात केली, त्याच्या अर्धा तासानंतर दोन्ही भावंडे शेततळ्याच्या बुडाशी मिळून आले.

यानंतर, कुटुंबीयांनी तातडीने गौरव आणि सतीश आगळे दोघांनाही खाजगी वाहनातून अडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यावेळी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घुले यांनी या दोन्ही भावंडांना मृत घोषित करून त्यांची उतरीय तपासणी केली. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रणजीतसिंग दुल्लत करीत आहेत.


सम्बन्धित सामग्री