Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
अहवालातील 5 मुख्य निष्कर्ष
1. झाडाला पहिली धडक: विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका मोठ्या झाडावर आदळले होते. त्यानंतर विमानाने नियंत्रण गमावले आणि ते जमिनीवर कोसळले.
2. कमी दृश्यमानता (Low Visibility): बारामती विमानतळावर लँडिंगसाठी किमान 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असताना, अपघातावेळी ती केवळ 2000 ते 3000 मीटर इतकीच होती. धुक्यामुळे वैमानिकांना धावपट्टीचा अंदाज घेण्यात अडचण आली असावी, असा अंदाज आहे.
3. FDR आणि CVR डॅमेज: अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे 'फ्लाईट डेटा रेकॉर्डर' (FDR) उष्णतेने खराब झाला आहे. कॉकपीटमधील संभाषणाचा डेटा (CVR) सुरक्षितपणे काढण्यासाठी आता अमेरिकेतील तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.
4. धावपट्टीच्या त्रुटी: बारामतीचे एअरफिल्ड 'अनकंट्रोल्ड' श्रेणीत येते. तेथील रनवे मार्किंग फिकट असणे आणि 'टेबल-टॉप' रनवे असणे हे घटकही अपघाताला कारणीभूत ठरल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.
5. वैमानिकाचा शेवटचा संदेश: विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने रेडिओवर अत्यंत भीतीदायक शेवटचा संदेश दिला होता, ज्यातून अचानक नियंत्रण सुटल्याचे संकेत मिळतात.
अपघाताची तीन संभाव्य कारणे
प्राथमिक अहवालानुसार हा अपघात केवळ एका चुकीमुळे नाही, तर खालील तीन गोष्टींच्या संयोगामुळे झाला असावा:
हवामान: मर्यादेपेक्षा कमी दृश्यमानता आणि दाट धुके.
पायाभूत सुविधा: धावपट्टीवर नेव्हिगेशन साधनांचा अभाव (ILS/VOR नाही).
मानवी घटक: खराब हवामानात लँडिंग करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय.
हेही वाचा - Ajit Pawar Death One Month : अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण; राजकारण ते दुर्घटनेचा तपास, नेमकं काय काय घडलं? वाचा सविस्तर
पुढील पाऊल काय?
ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या ज्या कंपनीने हे उपकरण तयार केले आहे, त्यांची विशेष टीम भारतात येणार आहे. या 'रॉ डेटा'चे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाल्यावरच अंतिम अहवाल समोर येईल, ज्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.