Parbhani Accident : भक्तीच्या ओढीनं उज्जैनच्या दिशेनं निघालेल्या गंगाखेडमधील पाच तरुणांच्या प्रवासाचा अंत अत्यंत दुर्दैवी झाला. जिंतूरनजवळ मध्यरात्री झालेल्या एका भीषण कार अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण भाविक कारने उज्जैनला देवदर्शनासाठी निघाले होते. मध्यरात्री साधारण 12.15 च्या सुमारास जिंतूर शहराच्या जवळ असलेल्या अकोली पुलावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, कारमधील चौघांचा जागीच प्राण गेला.
मृतांची आणि जखमींची माहिती:
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व तरुण गंगाखेड येथील रहिवासी आहेत. या अपघातात रोहन संजय राठोड (वय 25, रा. गंगाखेड), कृष्णा बालाजी गुट्टे (वय 25, रा. गंगाखेड),बालाजी आश्रोबा आवटे (वय 27, रा. गंगाखेड),बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय 27, रा. गंगाखेड) यांचा मृत्यू झाला असून गोपाळ गणेश रोकडे (वय 25, रा. गंगाखेड) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
हेही वाचा - Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शाळांमध्ये माकडांचा उच्छाद; विद्यार्थी-शिक्षकांवर हल्ले, पालक भयभीत
पोलिसांची धाव आणि वाहतूक कोंडी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून, अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली आहे. एकाच गावातील चार तरुण मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गंगाखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.