BJP Wins NMMC : राज्याचे लक्ष लागलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनुभवी नेते गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला केवळ राखलाच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दारूण पराभव करत 'नवी मुंबईचा राजा' आपणच असल्याचे सिद्ध केले आहे. भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदाच लढणाऱ्या नाईक समर्थकांनी 111 पैकी बहुमताचा 56 हा आकडा सहज पार करत सत्तेवर कब्जा मिळवला आहे.
नाईकांचे 'स्वातंत्र्य' आणि फडणवीसांचा विश्वास
ही निवडणूक युतीत न लढता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार गणेश नाईक यांनी पहिल्यापासून बांधला होता. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचा दबाव असूनही, नाईक यांनी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना स्वतंत्र लढण्यासाठी राजी केले. "मला पूर्ण स्वातंत्र्य द्या, मी भाजपचा महापौर निवडून आणतो," हा त्यांचा दावा मतदारांनी खरा ठरवला आहे. त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना डावलून आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून दिली, ज्याचा फायदा भाजपला झाला.
शिंदे विरुद्ध नाईक; टोलेबाजीने गाजला प्रचार
या निवडणुकीत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. एकनाथ शिंदे यांनी 'नवी मुंबईत नवं सरकार' असा नारा दिला होता, त्याला नाईक यांनी 'नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं' म्हणत चोख प्रत्युत्तर दिले. प्रचारादरम्यान नाईक यांनी शिंदेंच्या पक्षाचा उल्लेख 'भूखंड पळवणारी टोळी' असा करत थेट आव्हान दिले होते. त्यांच्या 'टांगा पलटी, घोडे फरार' या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली होती.
हेही वाचा - BMC Election Results 2026 : मुंबई महापालिकेची आताची आकडेवारी काय?; पहा अजून किती जागांचे अंतिम निकाल येणं बाकी, पक्षनिहाय आकडेवारी समोर
विजयानंतर नाईकांचा 'अॅक्शन प्लॅन'
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर गणेश नाईक यांनी शहराच्या भविष्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. भाजपच्या या विजयावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'शहराची वाट लावणारा एफएसआय (FSI) आम्हाला नको, आम्हाला बॅलन्स एफएसआय हवा. उद्याच त्याबाबत पत्र देणार आहे. मला रस्त्यावर फेरीवाले आणि भिकारी नकोत. बाहेरून येऊन कोणी अक्कल शिकवली तर त्याला सोडणार नाही. उद्यापासून जाहिरातबाजी बंद करा आणि कामाला लागा,' अशा कडक सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
हेही वाचा - Mahapalika Election 2026 : मतदानाची शाई पुसल्याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा एकदा 'म्हैसूर पॅटर्न' परतणार
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून गेली 25 वर्षे गणेश नाईक यांचे येथे वर्चस्व आहे. या विजयामुळे त्यांनी सलग 6 वेळा महापालिकेत 'अजिंक्य' राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती, ज्यात नाईकांनी एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांची रणनीती पूर्णपणे मोडीत काढली.