Saturday, February 14, 2026 01:44:15 PM

Gold Silver Rate Today: मोठी बातमी! सोने-चांदीचे दर कोसळले; पाहा आजचे ताजे दर

कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, सोने-चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी आपली नफावसुली सुरू केली आहे.

gold silver rate today मोठी बातमी सोने-चांदीचे दर कोसळले  पाहा आजचे ताजे दर

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गगनभरारी घेणाऱ्या सोने-चांदीच्या किमतींना अखेर ‘ब्रेक’ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुसाट सुटलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र शुक्रवारी बाजार उघडताच मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी नरमाईचे संकेत दिले असून, गुंतवणूकदारांनी नफावसुलीला (Profit Booking) प्राधान्य दिल्याने दरांचा पारा खाली उतरला आहे.

चांदीची ऐतिहासिक माघार आणि सोन्याची स्थिती

काही दिवसांपूर्वी चांदीने प्रति किलो तीन लाखांचा टप्पा गाठण्याची तयारी दर्शवली होती, मात्र जागतिक घडामोडींमुळे या तेजीला लगाम बसला आहे. शुक्रवारी MCX वर मार्च महिन्याचे चांदीचे वायदे दोन टक्केहून अधिक घसरून 2,85,676 रुपयांवर आले. दुसरीकडे, सोन्याच्या दरातही अर्ध्या टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, फेब्रुवारीचे वायदे 1,42,434 रुपये (प्रति 19 ग्रॅम) या पातळीवर खाली आले आहेत. सलग तीन दिवसांच्या तुफानी तेजीनंतर झालेली ही घसरण सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासा मानली जात आहे.

हेही वाचा: BMC Election Results 2026 : अटीतटीच्या लढतीत भाजपचे आघाडीवर, तर ठाकरे बंधू...

मुंबईतील आजचे किरकोळ दर

जागतिक बाजारातील पडसाड स्थानिक बाजारपेठेतही उमटली आहे. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,43,400 रुपये इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1,31,450 रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे, स्पॉट मार्केटमध्ये चांदीने 2,95,100 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता, जो आता कमी झाला आहे. ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की, हे दर केवळ बाजारातील असून यात जीएसटी (GST) आणि घडणावळीचे शुल्क (Making Charges) यांचा समावेश नाही.

घसरणीचे नेमके कारण काय?

सोने-चांदीच्या या ‘उतरत्या आलेखा’ मागे अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी कारणीभूत ठरली आहे. अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये अनपेक्षित घट झाल्याने तिथली अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाली असून डॉलर निर्देशांकात (Dollar Index) मोठी वाढ झाली आहे. डॉलर वधारल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीवर दबाव निर्माण झाला आणि किमती कोसळल्या.

तज्ज्ञांचे मत: ‘नफावसुली’चा फटका

कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, सोने-चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी आपली नफावसुली सुरू केली आहे. “तेजीच्या लाटेत जेव्हा किमती अवास्तव वाढतात, तेव्हा बाजारात नैसर्गिक घसरण होणे अपेक्षित असते,” असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. तसेच, देशांतर्गत बाजारात वाढलेल्या किमतींमुळे दागिन्यांची मागणी घटली असून, त्याचाही परिणाम किमतींवर होताना दिसत आहे.

हेही वाचा: Rohit Pawar: "आम्ही भाजपची B-Team आहोत हे तर ..." निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कारभारावर रोहित पवारांचा हल्लाबोल


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या