गोंदिया: राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कारभार सांभाळला आहे. तसेच जनसंघापासून ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या निधनाच्या घटनेमुळे कुटुंबियांसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर व संजय शिवणकर यांच्यासह बराच मोठा परिवार आहे.
महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री, माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांचे आज 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. महादेवराव शिवनकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये सिंचन मंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत पहिल्यांदा माजी खासदार शिवणकर यांनी केली होती. त्यांनी गोंदिया जिल्ह्यात पाटबंधारे मंत्री असताना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार सारखे सिंचनाचे प्रकल्प झाले आहेत.
हेही वाचा: Medha Kulkarni: 'शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्यांना सोडणार नाही', खासदार मेधा कुलकर्णींनी दिला इशारा
संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा राजकीय प्रवास
माजी मंत्री महादेवराव शिवनकर हे 1978,1980,1985, 1995,1999 अशा पाच वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत. 2004 मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्याबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत केली होती.1995 ते 1997 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळमध्ये जलसंपदा मंत्री राहिले. 1997 ते 1999 मध्ये मनोहर जोशी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी वित्तमंत्री म्हणून काम पाहिले आहे.