Pune Metro Expansion: पुणे शहरात मेट्रोला मिळणारा प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद पाहून 'महामेट्रो'ने आता आपली प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील मेट्रो मार्गिकांवर सध्या दिवसाला सरासरी 2 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. ही वाढती संख्या आणि भविष्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची गरज लक्षात घेता, आता मेट्रोची डब्यांची संख्या 3 वरून थेट 6 केली जाणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार असून गर्दीचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
6 डब्यांच्या मेट्रोसाठी 'डीपीआर' आणि नवीन ट्रेन्स
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या डब्यांच्या विस्तारासाठी 'अर्बन मास ट्रान्झिट कंपनी' (UMTC) कडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, विस्तारित मार्गांसाठी दोन टप्प्यांत मिळून एकूण 27 नवीन ट्रेन दाखल होणार आहेत, ज्यामुळे मेट्रोची वारंवारता देखील वाढण्यास मदत होईल.
शिवाजीनगर एसटी स्थानकाचा पुनर्विकास
दरम्यान, शिवाजीनगर येथील एसटी बस स्थानकाच्या पुनर्विकासाबाबत महामेट्रो आणि एसटी महामंडळ (MSRTC) यांच्यातील कराराचा मसुदा अंतिम झाला आहे. लवकरच एसटी महामंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून बस स्थानक, पार्किंग आणि व्यावसायिक विकासाच्या कामाला गती दिली जाईल. यामुळे मेट्रो आणि एसटी प्रवाशांसाठी एक एकात्मिक ट्रान्सपोर्ट हब उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा - Mumbai AC Local: मुंबईची 'लाईफलाईन' आता सुरक्षित ट्रॅकवर; स्वयंचलित दरवाजांच्या लोकलचे मुंबईकडे प्रस्थान
पुणे मेट्रोच्या तिजोरीत 133 कोटींची भर
गेल्या आर्थिक वर्षाची आकडेवारी पाहता पुणे मेट्रोच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. दोन्ही मार्गिका मिळून एकूण प्रवाशांची संख्या 7 कोटी 8 लाख इतकी राहिली आहे. उत्पन्नाचा विचार करता, तिकिटांतून 112 कोटी रुपये आणि इतर स्रोतांतून (Non-Fare Box) 21 कोटी रुपये असे एकूण 133 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेट्रोचा संचलन खर्च अंदाजे 150 कोटी रुपये आहे. महामेट्रोने 2030 पर्यंत टप्पा-2 मधील सर्व मार्गिकांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल.