Pune MHADA Lottery : नुकत्याच पार पडलेल्या 4,186 घरांच्या यशस्वी सोडतीनंतर, म्हाडाने आता गृहप्रेमींसाठी पुढचे पाऊल उचलले आहे. येत्या मार्च महिन्यात पुणे मंडळातर्फे आणखी 3,000 घरांची नवीन लॉटरी काढली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. घरांच्या वाढत्या मागणीचा विचार करून म्हाडाने ही नवीन योजना आखली आहे.
पुणे विभागातील नव्या घरांचे 'लोकेशन'
पुढील सोडतीत केवळ निवासी घरेच नव्हे, तर व्यापारी गाळ्यांचाही समावेश असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाईल:
ताथवडे: येथील फेज-2 मधील काम 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून, लवकरच 750 निवासी व अनिवासी गाळे विक्रीसाठी येतील.
शिरूर व खराबवाडी: शिरूरमध्ये 574 सदनिका आणि खराबवाडीत 194 व्यापारी गाळ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
इतर शहरे: म्हाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदर या ठिकाणी देखील नवीन गृहप्रकल्प वेगाने आकारास येत आहेत.
बिल्डरांची मनमानी आता चालणार नाही
20 टक्के योजनेतंर्गत खासगी विकासकांकडून घर घेताना नागरिकांना होणाऱ्या त्रासाची म्हाडाने दखल घेतली आहे. बिल्डरांकडून मागितले जाणारे अवाजवी जास्तीचे पैसे रोखण्यासाठी म्हाडाने कठोर भूमिका घेतली आहे. अनेक तक्रारींचे निवारण करून वाढीव शुल्क रद्द करण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक विजेत्याला 50 टक्के पार्किंग मिळणे बंधनकारक असल्याचे सभापतींनी ठणकावून सांगितले. याव्यतिरिक्त, चंदनगर-खराडी येथील अतिक्रमण झालेली 15 गुंठे जमीन म्हाडाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आहे.
हेही वाचा - Bharat Bandh: कामगार हक्कांसाठी निर्णायक लढा; केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 12 फेब्रुवारीला देशभरात संप
पारदर्शक प्रक्रिया आणि विजेत्यांसाठी महत्त्वाची सूचना
म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल वानखडे आणि मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी स्पष्ट केले की, घरांची ही संपूर्ण सोडत प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जाते. आताच्या लॉटरीतील विजेत्यांनी 'IHLMS 2.0' या प्रणालीचा वापर करून आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरून घराचे ताबा पत्र लवकर मिळेल. जे नागरिक 20 टक्के योजनेत शिल्लक राहिलेल्या घरांसाठी उत्सुक आहेत, त्यांना 'Book My Home' पोर्टलवर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर घरांसाठी अर्ज करता येईल.