Saturday, May 17, 2025 09:17:16 PM

जळगावात जुन्या वादातून सिनेस्टाईल हत्या, आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावली

धरणगाव तालुक्यात गोपाल मालचे यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत गोळी झाडून खून; परिसरात भीतीचं वातावरण, पोलिस तपास सुरू.

जळगावात जुन्या वादातून सिनेस्टाईल हत्या आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावली

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका थरारक हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ माजवली आहे. विहीर फाट्याजवळ सोमवारी संध्याकाळच्या सुमारास गोपाल मालचे या युवकाचा सिनेस्टाईल पाठलाग करत गोळी झाडून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना इतकी थरारक होती की स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोपाल मालचे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचा रस्त्यात पाठलाग केला. विहीर फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीसमोर अडथळा निर्माण करून, त्यांना गाडीतून खाली उतरवण्यात आले. खाली उतरताच थेट डोक्यावर गोळी झाडण्यात आली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे  .

या थरारक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी तत्काळ पोलीसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी पवन देसले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला.
 

जोरात बोलणं बेतलं जीवावर; आयपीएल मॅच दरम्यान कांदिवलीत तरुणाची हत्या

या प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावली. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुना वाद या हत्येमागे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपीने गोळी मारल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याचीही माहिती आहे. सध्या पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, घटनास्थळी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत गोपाल मालचे यांच्यात पूर्वीपासूनच वाद होता. तोच वाद इतका गंभीर वळण घेईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. ही घटना केवळ एका खुनाची नाही, तर रागाच्या भरात टोकाची पावले उचलली जात असल्याची भयावह उदाहरण आहे. यामुळे अशा घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनासह नागरिकांनाही जागरूक राहण्याची गरज आहे.

सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास धरणगाव पोलीस करत असून, लवकरच यातील सर्व बाबींचा खुलासा होईल.


सम्बन्धित सामग्री