Nashik Share Market Fraud : ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आणि शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका तोतया ज्योतिषाने नाशिकमधील एका किराणा व्यावसायिकाला 73 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी सचिन देशमुख याने आपण माजी 'NSG' कमांडो असल्याचे भासवून लोकांचा विश्वास संपादन केला आणि नंतर कोट्यवधी रुपये घेऊन पोबारा केला.
अशी झाली फसवणूक
पीडित 48 वर्षीय दुकानदाराची आणि संशयित सचिन देशमुखची ओळख झाल्यानंतर, देशमुखने त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले. "तुमची कुंडली सांगते की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील," असे सांगून त्याने पीडिताला जाळ्यात ओढले. एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या दरम्यान ही फसवणूक झाली. पीडिताने विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण 73 लाख रुपये जमा केले.
हेही वाचा - प्रेमाचा खेळखंडोबा! आधी होणाऱ्या जावयासोबत पलायन, नंतर दागिने आणि पैसे घेऊन बहिणीच्या नवऱ्यासोबत पसार; त्या महिलेचा शोध सुरू
भोंदू ज्योतिषाकडून मोठ्या नफ्याचा दावा
तपासात समोर आले आहे की, सचिन देशमुख हा केवळ प्रत्यक्ष भेटीच नाही, तर 'Zoom' मीटिंग्सच्या माध्यमातूनही गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढत असे. "मी माजी कमांडो आहे," असे सांगून तो आपली विश्वासार्हता निर्माण करायचा. अनेकांना त्याने गुंतवणुकीवर अवास्तव नफ्याचे स्वप्न दाखवून पैसे उकळले.
20 तक्रारी दाखल, पोलिसांकडून शोध सुरू
दरम्यान, जेव्हा गुंतवणुकीवर परतावा मिळणे बंद झाले आणि देशमुख गायब झाला, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. नाशिक सायबर पोलिसांकडे आतापर्यंत अशाच प्रकारच्या सुमारे 20 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावरून फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी नागरिकांना अशा कोणत्याही जादा परताव्याच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.