Tuesday, February 17, 2026 04:39:35 PM

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, बडगुजरांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाच्या आरोपावरून राडा; नेमकं काय घडलं?

माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप करत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी समर्थकांसह जोरदार घोषणाबाजी केली.

 nashik election 2026  नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बडगुजरांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाच्या आरोपावरून राडा नेमकं काय घडलं

Nashik Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान नाशिकच्या सावतानगर परिसरात प्रचंड राडा झाला. माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप करत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी समर्थकांसह जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याने तणाव वाढला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

हेही वाचा - Nitin Gadkari : एका 'कुत्र्या'ने कसा मिळवून दिला पहिला महापालिका विजय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उलगडला रंजक किस्सा

काय आहे नेमकं प्रकरण? 

प्रभाग क्रमांक 29 मध्ये सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशीच त्यांच्या वडिलांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आणि रोख रकमेचे वाटप होत असल्याची चर्चा परिसरात पसरली. भाजपमधून बंडखोरी केलेले आणि सध्या मनसेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी या माहितीनंतर थेट बडगुजर यांच्या कार्यालयावर धाड टाकली. शहाणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सावतानगरमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. घोषणाबाजी आणि बाचाबाचीमुळे वातावरण चिघळले. अखेर वाढता जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला.

हेही वाचा - Voting Ink Removal : 'सॅनिटाझरनंही पुसली जातेय बोटावरची शाई', राज ठाकरेंचा आरोप; काय आहे सत्य?, 'जय महाराष्ट्र'नं दाखवली प्रात्यक्षिकं

राजकीय समीकरणांमुळे चुरस वाढली

सावतानगरमधील या घटनेला राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे, ज्यामुळे हा प्रभाग नाशिकमधील सर्वात संवेदनशील ठरला आहे.  मुकेश शहाणे यांनी भाजपमध्ये तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली होती, त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शहाणे यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने या प्रभागात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. आजच्या राड्यामुळे या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. सत्तेचा आणि पैशांचा वापर करून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं मुकेश शहाणे यांनी म्हटलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री