मुंबई: सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास किंवा स्वपुनर्विकासासाठी सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांकडून परवानगी अथवा अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) घेण्याची आवश्यकता नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच बॉम्बे हायकोर्टाने दिला असून महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महासंघाच्या मते, या आदेशामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, दलालांची भूमिका संपुष्टात येईल आणि राज्यातील हजारो ठप्प प्रकल्पांना गती मिळेल. न्यायालयाने स्पष्ट केले की उपनिबंधकाची भूमिका केवळ प्रक्रियात्मक पारदर्शकतेपुरती मर्यादित आहे. बैठकांची नोटीस, सल्लागार अथवा वास्तुविशारदांची नियुक्ती अशा मर्यादित बाबींशीच त्यांचा संबंध राहील. सोसायटीच्या अंतर्गत निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नाही.न्यायालयाने सहकार खात्याने दिलेल्या यास विरोधी असलेल्या आधीच्या परिपत्रकांना मागे घेण्याचाही आदेश दिला आहे.
महासंघाने सांगितले की हा निर्णय राज्यातील 1.26 लाखांहून अधिक सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आणि 2 लाख अपार्टमेंट कॉम्प्लेक्ससाठी मोठा दिलासा आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या शहरांत पुनर्विकासाचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा मोठा फायदा येथे होणार आहे. ‘‘परवानग्या आणि लालफितीतून फायदा घेणाऱ्या दलालांसाठी हा निर्णय मोठा धक्का आहे,’’ असे महासंघाने स्पष्ट केले.
हेही वाचा: Govt Ad Rates Hike: प्रिंट माध्यमांच्या जाहिरात दरात 26% वाढ, सरकारचा मोठा निर्णय
महासंघाचे तज्ञ संचालक अॅड. श्रीप्रसाद परब यांनी या निर्णयाचे दूरगामी परिणाम असल्याचे नमूद केले. ‘‘अनावश्यक परवानगीची पायरी दूर झाल्याने कामात विलंब होणार नाही आणि प्रक्रियेचा गैरवापरही थांबेल. पुनर्विकासाच्या मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयाने निर्देशात्मक स्वरूप दिले असून, केवळ महत्त्वाच्या सुरक्षात्मक बाबींवर क्वॉरम, 51% बहुमत आणि पारदर्शकता यावर भर देण्यात आला आहे. निर्णयक्षमता पुन्हा सोसायटी सदस्यांकडे परत आली आहे,’’ असे ते म्हणाले.
महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले की 4 जुलै 2019 च्या शासन परिपत्रकामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. ‘‘पुनर्विकासासाठी उपनिबंधकाची परवानगी आवश्यक आहे, असा समज तयार झाला होता. त्यामुळे सोसायट्यांना त्रास, विलंब आणि अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. आता न्यायालयाने हे सर्व प्रथागत प्रकार तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत,’’ असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की या निर्णयामुळे अनावश्यक न्यायालयीन वादही कमी होतील. ‘‘NOC च्या मागणीमुळे अनेक याचिका दाखल होत होत्या. आता प्रशासनिक स्पष्टता मिळाल्यामुळे न्यायालयावरचा भार कमी होईल,’’ असेही परब यांनी नमूद केले.
न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीमध्ये सर्वात श्रेष्ठ अधिकार हा सर्वसाधारण सभेकडेच राहतो. विकसकाची निवड असो वा पुनर्विकासाचा निर्णय नियमावली व 2019 च्या शासन निर्णयानुसार वैध बहुमताने घेतलेला निर्णय सर्व सदस्यांना बंधनकारक राहील.
उपनिबंधक किंवा अधिकृत अधिकारी फक्त विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून क्वॉरम आणि बैठकीची नोंद तपासू शकतात; मात्र त्यांना कोणतेही निर्णायक किंवा व्हेटो अधिकार नाहीत, हेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा: GST नवीन प्रणालीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा