Ajit Pawar Plane Crash: 'विमान उतरलं की सर्वात आधी काटेवाडीला जाणार, आईचे आशीर्वाद घेणार आणि मगच प्रचाराचा नारळ फोडणार...' हे अजित पवारांचे शेवटचे शब्द होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्यापूर्वी आपल्या मातोश्रींची भेट घेण्याची त्यांची ओढ नियतीने अर्धवट सोडली. 28 जानेवारीच्या त्या काळरात्रीने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या पर्वाचा शेवट केला.
शेवटचा फोन आणि 'ती' कागदपत्रे
अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर यांनी त्या दिवशीच्या शेवटच्या क्षणांचा थरार सांगितला. गुजर यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी 7 वाजता दादांचा फोन आला होता. "मी 8:45 ला बारामतीत उतरतोय, कागदपत्रं घेऊन एअरपोर्टवर ये," असं दादांनी सांगितलं होतं. आई आशाताई पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवसभरात चार जाहीर सभा गाजवायच्या होत्या.
हेही वाचा - Pawar Family Meeting : राजकीय क्षेत्रात मोठी घडामोड, सुनेत्रा पवार मुंबईत तर पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, नेमकं घडतंय तरी काय?
आईसोबतचा तो अर्धा तास...
अजित पवार कितीही व्यस्त असले तरी बारामतीत आल्यावर काटेवाडीला जाऊन आईसोबत वेळ घालवल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. कधी पाच मिनिटे तर कधी अर्धा तास, आईच्या सहवासात ते सर्व ताणतणाव विसरून जायचे. दुर्दैवाने, त्या दिवशी मातोश्रींच्या भेटीपूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
डोळ्यादेखत विमानाचा आगीचा गोळा झाला
किरण गुजर हे धावपट्टीवर दादांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांनी पाहिलेला तो थरार अंगावर काटा आणणारा आहे. "विमान आकाशात दिसलं, पण त्याचा वेग अनाकलनीय होता. धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान हवेत दोनदा गरगर फिरलं आणि थेट जमिनीवर कोसळलं. काही क्षणांत मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांनी विमानाला वेढलं."
छिन्नविछिन्न अवस्थेतही दादांना ओळखलं
विस्फोटानंतर एक मृतदेह विमानातून बाहेर फेकला गेला. गुजर धावत तिथे पोहोचले तेव्हा समोरचं दृश्य भयावह होतं. "तो देह छिन्नविछिन्न झाला होता, पण चार दशकांचा सहवास असल्याने मी दादांना लगेच ओळखलं. त्यांच्या मृतदेहाभोवती निवडणुकीच्या फाईल्स आणि कागदपत्रं विखुरलेली होती. शेवटच्या श्वासापर्यंत हा नेता जनतेच्या कामातच मग्न होता," अशा भावना गुजर यांनी व्यक्त केल्या.