Devendra Fadnavis: नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना अत्यंत खोचक आणि कडक शब्दांत फटकारले. "जर जादूटोण्याने सर्व समस्या सुटत असत्या, तर आपण अशोक खरातलाच 'राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार' (NSA) म्हणून नियुक्त केले असते; मग सीमेवर जवान पाठवण्याची गरजच काय होती?" अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भोंदूगिरीची खिल्ली उडवत कडक कारवाईचे संकेत दिले. महाराष्ट्र हा संतांचा आणि पुरोगामी विचारांचा प्रदेश असून येथे अशा अघोरी प्रथांना थारा दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील रेषा ओलांडली
सभागृहाला माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि गाडगेबाबा यांसारख्या थोर संतांनी ईश्वरी भक्ती शिकवली, पण त्यांनी अंधश्रद्धेच्या विळख्यावर नेहमीच प्रहार केला. "आत्मविश्वास असणे चांगले आहे, पण जेव्हा तो विवेकाची साथ सोडून अंधश्रद्धेपर्यंत पोहोचतो, तेव्हा माणसाचे अध:पतन सुरू होते," असे फडणवीस यांनी नमूद केले. खरात प्रकरणात श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधील ती 'थीन लाईन' ओलांडली गेली असून, समाजाने अशा भोंदू लोकांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
"लिंबू-मिरचीने युद्धे लढली जात नाहीत"
अंधश्रद्धेवर उपरोधिक टीका करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधक आणि समाजकंटकांना खडे बोल सुनावले. "जर भोंदूगिरीत एवढी ताकद असती, तर आपण ड्रोन आणि क्षेपणास्त्रांऐवजी लिंबू-मिरचीने युद्धे लढलो असतो. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी सीमेवर जाण्याची गरजच उरली नसती, इथूनच 'टाचण्या' टोचून त्यांना संपवले असते. अगदी आम्हाला निवडणुकांसाठी सभा घेण्याचीही गरज पडली नसती; एका जागी बसूनच निवडणुका जिंकता आल्या असत्या," असे फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. वास्तव हे विज्ञानावर आणि कष्टावर आधारित असते, हे त्यांनी या विधानातून पटवून दिले.
हेही वाचा - Sunetra Pawar : तटकरे-पटेलांचा 'तो' प्लॅन फोल ठरणार? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांची महत्त्वाची भूमिका
कठोर कारवाई आणि कायद्याची अंमलबजावणी
अशोक खरातवर आतापर्यंत 7 गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले की, ज्यांच्याकडे या संदर्भात काहीही पुरावे किंवा माहिती असेल, त्यांनी ती भीती न बाळगता प्रशासनाला द्यावी. भविष्यात कोणाचीही अशी भोंदूगिरी करण्याची हिंमत होणार नाही, अशी जरब बसवणारी शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात असले, तरी सध्याच्या कलमांनुसार कारवाईत कोणताही अडथळा येत नसल्याचे स्पष्ट करत, "रामराज्य आणि महाराष्ट्र धर्मात भोंदूगिरीला थारा नाही," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.