Maharashtra Weather Alert : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात उघडीप झाली असली तरी अद्याप राज्यावर अस्मानी संकटाचे ढग घोंगावत आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला गेला आहे, तसेच या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट लागू आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, 30 ते 40 किमी/तास वेगाने वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट लागू असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा - Bandra-Worli Sea Link Tunnel: नवी मुंबई विमानतळासाठी वांद्रे-वरळी सी लिंक व बीकेसीला बोगद्याद्वारे जोडण्याची योजना सुरू
अरबी समुद्रावर निर्माण झालेले शक्ती चक्रीवादळ ओमानकडे सरकत असून, त्याचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून येणाऱ्या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे काही भागात गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि स्थानिक मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा - Mumbai Metro 3 : ॲक्वा लाईनचा मुंबईकरांना होणार 'हा' सर्वात मोठा फायदा! वाचा मार्ग आणि प्रमुख वैशिष्ट्ये
याशिवाय, किनारी जिल्ह्यांमध्ये पालघर आणि ठाणे येथे जोरदार वारे आणि विजांसह वादळ येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. IMD ने लानिना चक्रवाताचा संभाव्य परिणाम नोंदवला असून यामुळे हिवाळा यंदा थंड राहण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रज्ञांनी पुढील काळात अधिक पाऊस, तीव्र थंडी आणि उच्च उष्णतेची शक्यता असल्याचे सांगितले आहे.