Sunday, March 08, 2026 12:51:15 PM

Unseasonal Rain: IMD चा मोठा इशारा! अवकाळी पावसाने विदर्भ-मराठवाड्यात हाहाकार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात तडाखा दिला आहे.

unseasonal rain imd चा मोठा इशारा अवकाळी पावसाने विदर्भ-मराठवाड्यात हाहाकार ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्र: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह सरी कोसळल्या आहेत. या अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने तडाखा दिल्याने मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतही ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सोमवारी राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह सरी कोसळल्या. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले. काढणीस आलेली ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांना फटका बसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. शेतात सुकवण्यासाठी ठेवलेली कडधान्ये पावसात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

मराठवाड्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. काही भागांत गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांना मोठा फटका बसला असून, कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विदर्भात नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांतही पावसाचा प्रभाव जाणवला. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाची सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या सरींमुळे काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शेकडो हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे.

महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून प्राथमिक आकडेवारीनुसार ५३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याची नोंद आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, राज्याच्या इतर भागांत ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसाच्या तापमानात वाढ होत असली तरी वातावरणात अस्थिरता कायम असल्याने पुढील २४ तास महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान खात्याने नागरिकांना वीजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे, झाडाखाली उभे राहू नये तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या