मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज, 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या, 16 जानेवारी रोजी सर्वांच्या समोर येईल. मुंबई महापालिकेसह 29 महापालिकासाठी निवडणूक होत आहे. मात्र सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागल्या आहेत. या मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईतील काही महत्त्वाचे पण ज्वलंत मुद्द्यांचं भवितव्य निश्चित होणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
मराठीसाठी एकीकरण
मराठी आणि अमराठी हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मात्र या वर्षा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून तब्बल 20 वर्षांनंतर दोन भाऊ, दोन पक्ष एकत्र आल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. त्यामुळे यंदा मुंबई महानरपालिका निवडणुकीमध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा प्रभावी राहिला आहे. हिंदी भाषा सक्तीची करावी, या सरकारच्या योजनेमुळे पेटून उठलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे हे दोघे बंधू महापालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढत आहेत. ठाकरे बंधूंनी भाजप हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट आखत आहेत, असा दावा केला आहे. तसेच भाजप हा महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादत असल्याचा आणि परप्रांतियांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही ठाकरे बंधूंकडून करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीनेही मराठीचा मुद्दा विचारात घेतलेला आहे. तसेच मुंबईत मराठी माणसाला परत आणण्यापासून ते मुंबईत मराठी महापौर करण्यापर्यंतची आश्वासनं दिली आहेत. आता मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची कामगिरी चांगली झाली तर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्य पातळीवर प्रभावी होईल. तर मात्र भाजपाची सरशी झाली तर मराठी अस्मितेच्या मुद्द्याला धक्का बसू शकतो.
महायुतीत दुरावा
गेल्या वर्षी 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांनी दणदणीत विजय मिळवला होता. मात्र राज्यातील महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्ष अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती झाली आहे. मात्र इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वबळावर लढत आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदेसेना यांच्या युतीमधील केवळ भाजपची कामगिरी चांगली झाली आणि सेना तुलनेने अयशस्वी ठरली तर महायुतीचं भवितव्य अधांतरी सापडेल. तसेच भाजप भविष्यात एकट्याने वाटचाल करण्याचा विचार करू शकेल.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याचं भवितव्य
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू जुना वाद मिटवून एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोन्ही भावांमध्ये 20 वर्षांनंतर झालेलं मनोमीलन हे केवळ निवडणुकीपुरतं असल्याचा दावाही काही जण करताहेत. मात्र मुंबई महानगपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळालं तर ही युती अधिक भक्कम होऊन महाराष्ट्रामध्येही एक नवी राजकीय ताकद म्हणून समोर येऊ शकते. मात्र अपयश आलं तर मात्र या युतीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर शिवसेनेत वर्चस्वाची लढाई सुरू झाल्यावर राज ठाकरे बाहेर पडले होते. त्यामुळे या निवडणुकीनंतरही दोन्ही भावांमध्ये पुन्हा जुने मतभेद उफाळू शकतात, असा दावाही काही जणांकडून केला जात आहे.
अदानीवर डागली तोफ
यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत परप्रांतीय आणि विशेष करून मुंबईवर होत असलेल्या गुजराती आक्रमणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला. भाजपा मुंबई अदानींना आंदण देत असल्याचा आरोपही ठाकरेंकडून करण्याला आला. तसेच मुंबईतील परप्रांतियांविरोधातही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे मतदानावर मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडू शकतो. मात्र ठाकरे बंधूंकडून परप्रांतियांविरोधात घेण्यात आलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्याविरोधात अमराठी मतदारांचं एकत्रिकरण होऊन हा मुद्दा ठाकरे बंधूंच्या युतीवर उलटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र तरीही मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका जिंकली तर मराठी अस्मिता पुन्हा एकदा धारदार होऊ शकते.