Pune ZP Election Result : राज्याच्या ग्रामीण राजकारणाचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलानुसार, उत्तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (दोन्ही गट एकत्र) जोरदार मुसंडी मारली असून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. 73 जागांसाठी सुरू असलेल्या या लढतीत राष्ट्रवादीने 36 जागांवर आघाडी घेत आपले वर्चस्व राखले आहे.
राजकीय समीकरणे आणि वर्चस्व
राजकीय वर्तुळाला धक्का देणाऱ्या अजित पवार यांच्या अकाली निधनानंतरची ही पुण्यातील पहिलीच मोठी निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढवल्याचा फायदा होताना दिसत आहे. विशेषतः जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि खेड या तालुक्यांत टपाली मतमोजणीत राष्ट्रवादीचे पारडे जड राहिले आहे. सकाळी हाती आलेल्या कलानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस 36, भारतीय जनता पक्ष 17, शिवसेना (एकनाथ शिंदे) 12, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 05, शिवसेना (ठाकरे गट) 02 आणि काँग्रेस 01 जागेवर आघाडीवर आहे.
हेही वाचा - Sangli Zilla Parishad Election Results 2026: सांगली जिल्हा परिषदेत भाजप नंबर वन,शरद पवार गटाने काँग्रेसला टाकलं मागे
पंचायत समितीतही राष्ट्रवादीची सरशी
जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या 146 जागांचेही निकाल समोर येत आहेत. यात राष्ट्रवादीने 72 जागांवर आघाडी मिळवत जवळपास निम्म्या जागांवर आपला दावा ठोकला आहे. दुसरीकडे, भाजपने 48 जागांवर आघाडी मिळवत जोरदार झुंज दिली आहे. मात्र, काँग्रेसची कामगिरी या निवडणुकीत सर्वात निराशाजनक राहिली असून त्यांना केवळ 01 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निकालांमुळे पुण्याच्या ग्रामीण राजकारणावर राष्ट्रवादीची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.