ठाणे महापालिका निवडणूक युतीत शिंदेसेनेला 75, तर भाजपला 28 जागा मिळाल्या, त्यानंतर ठाण्यात महापौपदी कोण बसणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने, ठाण्यातील महानगरपालिकेतील महापौरपदासाठीची रस्सीखेच अंतिम टप्प्यात आली आहे. असं असताना आता शिवसेना शिंदे गटाकडून शर्मिला पिंपळोलकर या ठाण्याच्या महापौरपदी विराजमान होत आहेत. तर भाजपकडून कृष्णा पाटील हे उपमहापौर पदाची जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे विमल भोईर, शर्मिला पिंपळोलकर आणि डॉ. दर्शन जानकर यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेच्या महापौर केबिनमध्ये शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर दुसरीकडे भाजपने कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.