Thackeray Brothers Meet: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या बांद्र्यातील ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट देत कुटुंबासह जेवण केलं. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आई कोकिला ठाकरे आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या भेटीला राज यांनी कौटुंबिक म्हटलं असलं तरी, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 'ही एक कौटुंबिक भेट आहे. माझी आई माझ्यासोबत आहे,' असं राज ठाकरे यांनी मातोश्रीवर प्रवेश करताना पत्रकारांना सांगितलं. पण राजकीय विश्लेषकांच्या मते, हे केवळ कौटुंबिक जेवण नव्हतं, तर ठाकरे बंधूंमधील वाढत्या जवळिकीचं आणि संभाव्य राजकीय पुनर्मिलनाचं प्रतीक होतं.
अलिकडच्या काही महिन्यांत राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही सहावी भेट आहे. जुलै महिन्यात दोघे जवळपास 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यानंतर राज यांनी उद्धव यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी भेट दिली, तर उद्धव यांनी ऑगस्टमध्ये राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणेशोत्सवाला उपस्थिती लावली.
हेही वाचा - Vasai Virar Election: वसई-विरार महापालिका निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे?, नेमकं कारण काय?
प्राप्त माहितीनुसार, या भेटींमागे राजकीय रणनीतीचा धागा असल्याचे संकेत आहेत. बीएमसी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर प्राथमिक चर्चा सुरू आहे. मनसे मुंबईत 90 ते 95 जागांची मागणी करत असल्याचं सांगितलं जातं. जर औपचारिक युती झाली, तर सेना (यूबीटी) आणि मनसेची संयुक्त आघाडी मराठी मतदारसंघांमध्ये प्रभाव वाढवून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला गंभीर आव्हान ठरू शकते.
हेही वाचा - BJP Meeting For Election : मध्यरात्री भाजपची बैठक, रणनीती ठरली; भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढणार?
दरम्यान, मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असल्याने, या निवडणुकीतील प्रत्येक राजकीय हालचाल महत्त्वाची मानली जाते. ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक भेटीमुळे राजकीय समीकरणांमध्ये नव्याने फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.